रेल्वे ओव्हरब्रिजचे काम संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:09 AM2021-03-05T04:09:53+5:302021-03-05T04:09:53+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : नागपूर-कळमेश्वर-काटाेल मार्गाला चेन्नई-नागपूर-दिल्ली रेल्वेमार्ग छेदून गेल्याने या मार्गावरील कळमेश्वर शहराच्या तिन्ही भागाला रेल्वे फाटक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : नागपूर-कळमेश्वर-काटाेल मार्गाला चेन्नई-नागपूर-दिल्ली रेल्वेमार्ग छेदून गेल्याने या मार्गावरील कळमेश्वर शहराच्या तिन्ही भागाला रेल्वे फाटक आहेत. यातील कळमेश्वर-काटाेल मार्गावरील (घाेराडजवळ) रेल्वे फाटकाजवळ रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामाला सुरुवात करण्यात आली. हे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना त्रास हाेत असून, फाटकाजवळील वाहतूक काेंडी अपघातास कारणीभूत ठरत आहे.
चेन्नई-नागपूर-दिल्ली या रेल्वेमार्गावर धावणाऱ्या प्रवासी व मालगाड्यांची संख्या अधिक असल्याने तिन्ही फाटक दर १५ मिनिटांनी बंद हाेते. ही समस्या साेडविण्यासाठी कळमेश्वर शहराच्या बाहेरून बायपास राेडची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, कळमेश्वर शहरात येण्यासाठी नागरिकांना या तिन्ही फाटकांना ओलांडण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे कळमेश्वर-काटाेल मार्गावर रेल्वे ओव्हरब्रिजच्या निर्मितीला सुरुवात करण्यात आली.
परिणामी, शहरातील नागरिकांना कळमेश्वर-काटाेल मार्गावर जाण्यासाठी किंवा इतरांना शहरात येण्यासाठी आसरामाय मंदिराजवळील रोडवरून बायपास राेडवर जावे लागते. या मार्गावरील प्रवास अडचणीचा व त्रासदायक आहे. शिवाय, या मार्गावरील प्रवास दिवसेंदिवस धाेकादायक बनत चालला आहे. दाेन वर्षापूर्वी या मार्गावर झालेल्या अपघातामध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा मृत्यू झाला हाेता. या दाेन्ही ठिकाणच्या रेल्वे ओव्हरब्रिजची कामे संथगतीने सुरू असल्याने नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे या कामाला वेेग देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
...
एक ओव्हरब्रिज रखडला
रेल्वे फाटकाजवळील वाहतूक काेंडीमुळे दुचाकी वाहने स्लीप हाेऊन अपघात हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. वास्तवात कळमेश्वर शहराजवळ तीन रेल्वे ओव्हरब्रिजची आवश्यकता आहे. यातील एकाच्या कामाला सुरुवात झाली असून, कळमेश्वर-गाेंडखैरी मार्गावरील ओव्हरब्रिजसाठी तीनदा सर्वेक्षण करण्यात आले. परंतु, या ओव्हरब्रिजला अद्यापही प्रशासकीय मंजुरी देण्यात आली नाही. स्थानिक नेतेही ही समस्या मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेत नाही.