'ट्रस्टेड पुलिसिंग'मध्ये रेल्वे पोलिसांना तीन पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2023 10:50 PM2023-06-10T22:50:12+5:302023-06-10T22:50:40+5:30
Nagpur News मिशन ट्रस्टेड पुलिसिंग या उपक्रमाअंतर्गत राज्याच्या पोलिस महासंचालकांनी मांडलेल्या कल्पनेत नागपूर रेल्वे पोलिसांच्या कामगिरीची 'चाैफेर' दखल घेतली गेली.
नागपूर : मिशन ट्रस्टेड पुलिसिंग या उपक्रमाअंतर्गत राज्याच्या पोलिस महासंचालकांनी मांडलेल्या कल्पनेत नागपूर रेल्वे पोलिसांच्या कामगिरीची 'चाैफेर' दखल घेतली गेली. या उपक्रमाअंतर्गत पोलिस दलात राहून चांगले काम करणाऱ्या राज्यातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुरुवारी, ८ जूनला सन्मानित करण्यात आले. त्यात नागपूर रेल्वे पोलिसच्या ठाणेदार मनीषा काशिद यांना तीन पुरस्कार (प्रशस्तिपत्र) देऊन सन्मानित करण्यात आले.
कोणत्याही गुन्ह्याची अथवा घटनेची वाट न बघता पोलिस अधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने काम तो गुन्हा कसा टाळता येईल, यासाठी प्रयत्न करावे. कुणाच्या बोलावण्याची वाट न बघता अडचणीतील व्यक्तीला कशी स्वयंस्फूर्तीने मदत करता येईल, ते करावे आणि नागरिकांचा विश्वास जिंकावा, अशी कल्पना महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी मांडली. त्यानुसार काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यासाठी 'बेस्ट पुलिसिंग' स्पर्धा वजा उपक्रम आयोजित केला. त्यात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या राज्यातील पोलिस अधिकारी आणि अंमलदारांची दखल घेऊन गुरुवारी त्यांना सन्मानित करण्यात आले. यात रेल्वे पोलिस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी तिघांचे प्राण वाचविल्याबद्दल तीन पुरस्कार पटकावले.
राज्यात एकमात्र तीन !
उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल एकसाथ तीन पुरस्कार मिळवण्याचा मान राज्यातील एकमात्र नागपूर रेल्वे पोलिसांनी मिळवल्याचे ठाणेदार काशिद यांनी आज पत्रकारांना सांगितले. अकोला, बडनेरा आणि गोंदिया पोलिसांनादेखील प्रत्येकी एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रोख आणि प्रशस्तिपत्रक असे पुरस्काराचे स्वरूप आहे.