पावसाळी अधिवेशनासाठी रेल्वे सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 11:34 PM2018-07-02T23:34:09+5:302018-07-02T23:35:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवारपासून उपराजधानीत सुरू होत असून त्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या मंत्री, आमदार, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी दुरांतो, सेवाग्राम, महाराष्ट्र व अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसला प्रत्येकी एक अतिरिक्त द्वितीय श्रेणी वातानुकूलित कोच जोडण्यात येणार आहे. याशिवाय या कोचमध्ये संबंधितांना प्राधान्यक्रमाने आरक्षण देण्यात येणार आहे.
विधिमंडळाचे अधिवेशन असल्याने मंत्रालयातील संपूर्ण यंत्रणा उपराजधानीत दाखल झाली आहे. मंत्री, आमदार, अधिकाºयांचे आगमन सुरू झाले आहे. त्यांच्या सुविधेसाठी सोमवारपासून रेल्वेगाड्यांना अतिरिक्त कोच लावणे सुरू झाले आहे. शनिवार, रविवार सुटी असल्याने मंत्री, आमदार मतदारसंघात परत जातात. त्यांच्या सुविधेसाठी रेल्वेगाड्यांना अतिरिक्त कोच जोडण्यात येत आहेत. बुधवारी सेवाग्राम एक्स्प्रेस, दुरांतोला, ६ व ७ जुलै रोजी सेवाग्राम एक्स्प्रेसला, १३ जुलै रोजी चारही गाड्यांना अतिरिक्त कोच लावण्यात येतील. त्यानंतर १४ व १५ जुलैला सेवाग्राम एक्स्प्रेसला, २० जुलै रोजी चारही गाड्यांना, २१ जुलैला सेवाग्राम एक्स्प्रेस, २३ जुलैला सेवाग्राम एक्स्प्रेस व दुरांतोला अतिरिक्त कोच जोडण्यात येणार आहे. २७ जुलैपर्यंत संबंधित रेल्वेगाड्यांना अतिरिक्त कोच लावण्याचे नियोजन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने केले आहे. या अतिरिक्त कोचमध्ये मंत्री, आमदारांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांना या कोचमध्ये प्राधान्यक्रमाने आरक्षण देण्यात येणार असून, बर्थ शिल्लक राहिल्यास सर्वसामान्य प्रवाशांना बर्थ उपलब्ध करून देण्यात येतील.