वैदर्भीयांच्या गोवा टूरमध्ये रेल्वेचा खोडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 10:00 AM2018-06-26T10:00:03+5:302018-06-26T10:04:50+5:30
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून उन्हाळ्यात अजनी ते करमाळी ही स्पेशल रेल्वेगाडी सुरू करण्यात आली होती. परंतु ही गाडी मुदत संपल्यानंतर रेल्वेने बंद केली. यामुळे गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांना त्याचा मोठा फटका बसला आहे.
दयानंद पाईकराव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरसह विदर्भातून हजारो पर्यटक गोवा आणि कोकणात जातात. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून उन्हाळ्यात अजनी ते करमाळी ही स्पेशल रेल्वेगाडी सुरू करण्यात आली होती. या गाडीला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. परंतु ही गाडी मुदत संपल्यानंतर रेल्वेने बंद केली. यामुळे मुंबई, कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. विदर्भातील पर्यटकांची रेल्वेच्या या निर्णयामुळे गैरसोय होत असून, रेल्वेला विदर्भातील पर्यटकांचे वावडे आहे की काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे रेल्वेने या मार्गावर त्वरित रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी होत आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून उन्हाळ्यात ०१११९/०११२० अजनी-करमाळी-अजनी ही स्पेशल रेल्वेगाडी ९ एप्रिल ते ५ जून या कालावधीत सुरू करण्यात आली. ही गाडी अजनीवरून सुटून वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम या मार्गाने करमाळीला जात होती. विदर्भातून हजारो पर्यटक कोकणात आणि गोव्याला पर्यटनासाठी जातात. यामुळे या गाडीला विदर्भातील पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. खुद्द रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही या गाडीला प्रचंड प्रतिसाद असल्याचे मान्य केले होते. परंतु मुदत संपल्यामुळे ५ जूनला अखेरची फेरी झाल्यानंतर रेल्वे बोर्डाने ही गाडी बंद केली. यामुळे विदर्भातील पर्यटकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. पावसाळ्यात कोकणात आणि गोव्याला विदर्भातील हजारो पर्यटक जातात. रेल्वे बोर्डाने ही गाडी बंद केल्यामुळे आता पर्यटकांना टप्प्याटप्प्याने प्रवास करण्याची पाळी आली आहे. त्यामुळे पर्यटकांना मोठा त्रास होत असून, रेल्वे बोर्डाने विदर्भातील पर्यटकांची मागणी लक्षात घेऊन कोकण-गोव्याला जाण्यासाठी नियमित रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी होत आहे.
मुंबईसाठीही होती अतिरिक्त रेल्वेगाडी
अजनी-करमाळी ही रेल्वे बोर्डाने बंद केलेली रेल्वेगाडी केवळ कोकण आणि गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठीच उपयुक्त नव्हती, तर ही गाडी कल्याणपर्यंत जात असल्यामुळे मुंबईला जाणाऱ्यांसाठीही महत्त्वाची होती. मुंबई मार्गावर प्रवाशांची संख्या खूप अधिक असल्यामुळे मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाड्यात नेहमीच वेटिंगची स्थिती पाहावयास मिळते. त्यामुळे मुंबईसाठी उपलब्ध झालेली ही अतिरिक्त गाडी बंद झाल्यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांनाही त्याचा फटका बसला आहे.
‘नागपूरवरून गोव्यासाठी रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने मागील वर्षापासून रेल्वे बोर्डाकडे केलेली आहे. त्यामुळे रेल्वे बोर्डाने उन्हाळ्यात तीन महिन्यासाठी अजनी-करमाळी ही रेल्वेगाडी सुरू केली. मुदत संपल्यानंतर ही गाडी बंद करण्यात आली. कोणतीही नवी गाडी सुरू करण्याचा निर्णय रेल्वे बोर्ड घेते. नवी रेल्वेगाडी सुरू करण्यासाठी कोचेस उपलब्ध होणे गरजेचे असते. त्यामुळे कोच उपलब्ध झाल्यानंतर रेल्वे बोर्ड गोव्याला रेल्वेगाडी सुरू करण्याचा निर्णय घेईल.’
-कुश किशोर मिश्र, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे