प्रवाशांच्या हाती मुद्दल अन् रेल्वे खातेय व्याज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 10:52 AM2019-06-10T10:52:09+5:302019-06-10T11:00:37+5:30
प्रवासात गैरसोय होऊ नये यासाठी बहुतांश प्रवासी चार महिन्यांपूर्वी तिकीट काढून कन्फर्म तिकीट मिळवितात. परंतु संबंधित गाडी रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येते. यामुळे कन्फर्म तिकीट जवळ असूनही प्रवाशांना मनस्ताप होतो.
दयानंद पाईकराव।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवासाची तारीख ठरली तेव्हा बहुतांश प्रवासी चार महिन्यांपूर्वी तिकिटांचे आरक्षण करतात. प्रवासाच्या दिवशी ऐनवेळी काहीतरी कारण सांगून प्रवाशांना संबंधित गाडी रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येते. यामुळे प्रवाशांना मनस्ताप होतो. रेल्वे केवळ तिकिटाची रक्कम प्रवाशांना सोपवून त्यांची बोळवण करते. अशा वेळी प्रवाशांना झालेल्या मनस्तापाऐवजी त्यांना अधिक रक्कम द्यावयाची सोडून रेल्वे केवळ मुद्दल देऊन व्याज मात्र आपण खाण्याचा प्रकार करते. त्यामुळे ऐनवेळी गाडी रद्द केल्यामुळे मनस्ताप झालेल्या प्रवाशांना रेल्वेने व्याजासह पैसे परत करण्याची गरज आहे.
प्रवासात गैरसोय होऊ नये यासाठी बहुतांश प्रवासी चार महिन्यांपूर्वी तिकीट काढून कन्फर्म तिकीट मिळवितात. परंतु प्रवासाला निघताना ऐनवेळी प्रवाशांना संबंधित गाडी रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येते. यामुळे कन्फर्म तिकीट जवळ असूनही प्रवाशांना मनस्ताप होतो. चार महिन्यापूर्वी प्रवासी तिकिटांचे पैसे भरतात.
ही रक्कम थेट रेल्वेच्या खात्यात जमा होते. चार महिन्यापासून त्यावर मिळणारे व्याजही रेल्वेच्याच खात्यात जमा होते. परंतु ऐनवेळी गाडी रद्द करून प्रवाशांना तिकिटाची १०० टक्के रक्कम कोणतीही कपात न करता परत करण्यात येत असल्याचे सांगून रेल्वे प्रशासन उपकार केल्यासारखा आव आणते.
परंतु खरा प्रश्न निर्माण होतो तो चार महिन्यातील संबंधित रकमेवर मिळणाऱ्या व्याजाचा. चार महिन्यापूर्वी पैसे भरल्यामुळे रेल्वेला प्रवाशांच्या पैशांवर व्याज मिळते. त्यामुळे गाडी रद्द केल्यानंतर प्रवाशांना चार महिन्यांच्या व्याजासह रक्कम परत मिळणे आवश्यक आहे. रेल्वे प्रशासन मात्र तिकिटांची रक्कम परत करीत आपले हात झटकून घेते. ऐनवेळी रेल्वेगाडी रद्द केल्यामुळे प्रवाशांना मानसिक त्रास होतो. ऐनवेळी रेल्वेगाडी रद्द केल्यामुळे वेळेवर पोहोचण्यासाठी अनेक प्रवाशांना अधिक पैसे मोजून विमानाने जाण्याची पाळी येते. परंतु केवळ मुद्दल परत करून रेल्वे प्रशासन त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार करते.
त्यामुळे रद्द केलेल्या गाड्यांमधील प्रवाशांना त्यांनी तिकीट काढलेल्या तारखेपासूनचे व्याज देण्याची गरज आहे.
‘लेट’ गाड्यातील प्रवाशांनाही तोच नियम
अनेकदा रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावतात. कधी दोन तास तर कधी आठ तास गाड्यांना विलंब होतो. प्रवाशांनी वेळेनुसार गाड्यांचे आरक्षण केलेले असते. एका गाडीतून प्रवास केल्यानंतर त्यांना पुढील रेल्वेस्थानकावर दुसºया रेल्वेगाडीने प्रवास करावयाचा असतो. परंतु अनेकदा रेल्वेगाडीच उशिराने आल्यामुळे त्यांना पुढील रेल्वेस्थानकावर आरक्षण केलेली गाडी मिळत नाही. अशा वेळीही तिकीट रद्द करणाºया प्रवाशांना केवळ तिकिटाची रक्कम हातात देण्यात येते. रेल्वे प्रशासनाने अशा प्रवाशांना व्याजासह पैसे परत करण्याची मागणी होत आहे.
व्याजासह पैसे परत करावेत
‘रेल्वेकडून काही तांत्रिक कारणामुळे किंवा अन्य कारणांनी रेल्वेगाडी रद्द झाली असेल तर प्रवाशांना मनस्ताप होतो. त्यामुळे प्रवाशांना केवळ तिकिटाची १०० टक्के रक्कम परत न करता रेल्वेने त्यांना चार महिन्यांच्या व्याजासह रक्कम परत करावी.’
-बसंत कुमार शुक्ला, महासचिव, भारतीय यात्री केंद्र
व्याजासह पैसे देण्याचा निर्णय धोरणात्मक
‘ऐनवेळी गाडी रद्द केली असल्यास किंवा गाडी तीन तासापेक्षा अधिक लेट असल्यास तिकिटांच्या रकमेसोबत व्याज देणे हा धोरणात्मक निर्णय आहे. त्याबाबत विभागीय पातळीवर काहीच निर्णय घेता येऊ शकत नाही.’
-एस. जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे,
नागपूर विभाग