रेल्वे स्थानकातील ट्रॅकला नहरीचे स्वरूप

By नरेश डोंगरे | Published: July 20, 2024 03:10 PM2024-07-20T15:10:16+5:302024-07-20T15:11:48+5:30

स्थानकावर पाणीच पाणी : अनेक गाड्या आउटरवर थांबवले

Railway station tracks filled with water | रेल्वे स्थानकातील ट्रॅकला नहरीचे स्वरूप

Railway station tracks filled with water

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्त्यावरचे पाणी चक्क रेल्वे स्थानक आणि रेल्वे ट्रॅक वर शिरले. परिणामी रेल्वे ट्रॅकला नहरीचे स्वरूप आले. दरम्यान, रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्यामुळे वेगवेगळ्या भागातून येणाऱ्या रेल्वे गाड्या नागपूर शहराबाहेर आऊटरला थांबविण्यात आल्या.


नागपूर शहर आणि आजूबाजूच्या भागात शुक्रवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू झाला. पावसाचा वेग सारखा वाढतच असल्याने सकाळपर्यंत शहरातील अनेक रस्त्यावर पाणीच पाणी साचले. रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूचा सर्व भाग उंचावर आणि रेल्वे स्थानक त्या तुलनेत काहीसे खाली असल्यामुळे रस्त्यावरचे पाणी रेल्वे स्थानकात शिरले. ट्रॅक वरही मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले. त्यामुळे खबरदारीचा उपाय नागपूर रेल्वे स्थानकावर येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या अजनी, बुटीबोरी तसेच आजूबाजूच्या रेल्वे स्थानकाजवळ थांबविण्यात आल्या.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने यावर्षी संभाव्य स्थितीचा आढावा घेऊन मान्सूनपूर्व उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे रेल्वे ट्रॅक वरचे पाणी लवकर काढण्यात यश आले. त्यामुळे दुपारनंतर गाड्या सुरळीत झाल्या. परंतु सकाळच्या वेळेत नागपूर स्थानकावर येणाऱ्या आणि येथून सुटणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. काही गाड्या वीस मिनिटे, तर काही गाड्या अर्धा ते पाऊण तास उशिराने नागपुरातून धावू लागल्या. दरम्यान, दूरदूरहून नागपुरात पोहोचू पाहणाऱ्या रेल्वे प्रवाशांचा मोठा कोंडमारा झाला. शहराच्या बाहेर दूर अंतरावर गाड्या येऊन थांबल्या. बाहेर मोठ्या प्रमाणात पाणी सुरू असल्यामुळे प्रवासी गाडीतून खाली उतरून नियोजित ठिकाणी जाऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांना रेल्वे स्थानकावर गाड्या पोहोचेपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.
 

उशिरा धावणाऱ्या गाड्या 

ट्रेन नंबर १२७७१ सिकंदराबाद-रायपूर एक्स्प्रेस २० मिनिट उशिरा. १२१०५ सीएसएमटी-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस  १५ मिनिट, १२८५० पुणे-बिलासपूर एक्स्प्रेस १५ मिनिट, १२२९५ बेंगलुरू एक्सप्रेस,  ०१३७४ नागपूर-वर्धा स्पेशल मेमू  ३० मिनिट, २२१३७ नागपूर-अहमदाबाद प्रेरणा एक्स्प्रेस ३० मिनिट,१२४०६ नवी दिल्ली-भुसावळ गोंडवाना एक्सप्रेस २० मिनिट, २२७०६ जम्मू-तिरुपती एक्स्प्रेस ३० मिनिट, १२६८८ चंदीगड एक्सप्रेस ३० मिनिट उशिरा नागपुरातून सुटली.
 

Web Title: Railway station tracks filled with water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.