रेल्वेस्थानकांवर मिळेल रेल नीरचेच पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 02:54 PM2018-02-02T14:54:37+5:302018-02-02T14:55:51+5:30
रेल्वेस्थानकावर यापूर्वी अनेक कंपन्यांचे पिण्याचे पाणी बॉटलमध्ये मिळायचे. परंतु आता रेल्वे प्रशासनाने १ फेब्रुवारीपासून रेल नीर या ब्रॅण्डचेच पाणी नागपूर रेल्वेस्थानकावर विकण्याचा फतवा काढल्यामुळे भविष्यात याच कंपनीचे पाणी रेल्वेस्थानकावर मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेस्थानकावर यापूर्वी अनेक कंपन्यांचे पिण्याचे पाणी बॉटलमध्ये मिळायचे. परंतु आता रेल्वे प्रशासनाने १ फेब्रुवारीपासून रेल नीर या ब्रॅण्डचेच पाणी नागपूर रेल्वेस्थानकावर विकण्याचा फतवा काढल्यामुळे भविष्यात याच कंपनीचे पाणी रेल्वेस्थानकावर मिळणार आहे.
रेल्वे स्थानकावरील स्टॉल, जनआहार, फूड प्लाझा आणि पेंट्रीकार मध्ये कुठल्या प्रकारचे पाणी वापरायचे यासाठी नियमावली आहे. रेल्वे मुख्यालयाने ठरवून दिलेल्या कंपनीचेच पाणी विक्रीसाठी ठेवण्यात येत होते. त्यासाठी वाणिज्य विभागाकडून रीतसर निविदा काढली जायची. त्यानंतर संबंधित कंपनीचे पाणी पुरविण्यात येत होते. त्यामुळे ज्यांना एजन्सी मिळाली त्या एजन्सी मालकांनी आपली दुकानेच बाहेर थाटली. त्यांच्या मार्फत रेल्वे स्थानकावर पाणी पुरविले जात होते. आता मध्य रेल्वे मुख्यालयाने निर्णय घेतल्याने १ फेब्रुवारीपासून नागपूर रेल्वे स्थानकात रेल नीरचे पाणी विक्रीसाठी ठेवले जाणार आहे. नागपूर स्थानकाहून दररोज १५० पेक्षा अधिक रेल्वेगाड्या आणि ४५ ते ५० हजार प्रवासी ये-जा करतात. येथे दिवसाला पिण्याच्या पाण्याचे सिलबंद एक हजार बॉक्सची गरज आहे. एका बॉक्समध्ये जवळपास १२ बाटल्या असतात. त्यामुळे दिवसाकाठी जवळपास १२ हजार पाण्याच्या बाटल्यांची गरज भासते तर उन्हाळ्यात ही मागणी दुप्पट होते. नागपुरातही बुटीबोरी येथे रेल नीर प्लँट सुरू होणार आहे. या प्लँटसाठी वेळ असल्यामुळे सध्या नागपूर स्थानकावर बिलासपूर येथून पाणी पुरविल्या जाणार आहे. यामुळे स्थानिक एजन्सीधारक संकटात सापडले आहेत. अनेकांनी इतर कंपन्यांच्या पाण्याचा स्टॉक करुन ठेवल्यामुळे गोडाऊनमधील स्टॉकचे काय करायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.