नागपुरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार, दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:05 PM2019-05-27T22:05:54+5:302019-05-27T22:07:09+5:30
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोन दलालांना रेल्वे सुरक्षा दलाने सोमवारी रंगेहात अटक केली. त्यांच्याकडून ७०२० रुपये किमतीच्या दोन आरक्षणाच्या तिकिटांसह २८७४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दोन दलालांना रेल्वे सुरक्षा दलाने सोमवारी रंगेहात अटक केली. त्यांच्याकडून ७०२० रुपये किमतीच्या दोन आरक्षणाच्या तिकिटांसह २८७४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुन्हे शाखेचे निरीक्षक एस. के. मिश्र, निरीक्षक छेदीलाल, उपनिरीक्षक शिवराम सिंह, उपनिरीक्षक आर. के. यादव, आरपीएफ जवान प्रदीप कुमार यांनी शंकरनगर पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या पोस्ट आॅफिस कार्यालयात सकाळी १० वाजता धाड टाकली. तेथे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करीत असलेल्या दोन दलालांना अटक केली. त्यांनी आपले नाव अनुराग प्रेमप्रकाश जालान (४३) रा. टीबी हॉस्पिटलजवळ, गोपालजी अपार्टमेंट असे सांगितले. त्याने गरजू प्रवाशांना ४०० ते ५०० रुपये अधिक घेऊन तिकिट पुरवित असल्याची माहिती दिली. त्याच्याजवळून आरक्षणाचे थर्ड एसीचे २२६० रुपये किमतीचे तिकीट, मोबाईल ८ हजार, रोख १७२५ रुपये असा एकूण ११९८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोस्ट ऑफिसच्या बाहेर एक व्यक्ती तिकीट काढून जाताना दिसली. तिची चौकशी केली असता त्या व्यक्तीने आपले नाव कुणाल चंद्रशेखर हलमारे (२९) असे सांगितले. गरजू प्रवाशांना कमिशन घेऊन तिकीट पुरवित असल्याचे त्याने सांगितले. त्याच्याजवळून ४७६० रुपये किमतीचे तिकीट, मोबाईल १२ हजार असा एकूण १६७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त भवानी शंकर नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.