रेल्वे तिकीट काळाबाजाराची कारवाईदेखील अंधारात; छापामार कारवाईचा गोलमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2023 08:26 PM2023-05-20T20:26:54+5:302023-05-20T20:27:39+5:30
Nagpur News रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांविरुद्ध कारवाई करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेही गोलमाल करत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
नरेश डोंगरे
नागपूर : सुट्यांचा आनंद घेण्यासाठी चार दिवस परिवारासह बाहेर जाण्याचा बेत आखणाऱ्या हजारो प्रवाशांना रेल्वे प्रशासन लांबलचक वेटिंग लिस्ट दाखविते. दलाल वाकुल्या दाखवत त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळतात आणि दलालांच्या मुसक्या आवळून प्रवाशांना दिलासा देण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांच्याकडून दलालांवरच्या कारवाईचा गोलमाल होतो.
रिझर्वेशनच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांना जेवढे ताणून धरले तेवढे जास्त पैसे दलाल आणि त्यांच्यासोबत साटेलोटे असणाऱ्या भ्रष्ट मंडळींना मिळते. त्यामुळे बहुतांश गाड्यांचे रिझर्वेशन फुल्लच दिसते. वेटिंग लिस्ट वर 'मेरा नंबर कब आयेंगा' अशा मानसिकतेत असणाऱ्यांना आपला नंबर दलालाकडे गेल्याशिवाय येणार नसल्याची खात्री पटल्याने महिन्याआधीच कुटुंबांसह सफरीचा आनंद घेण्याचा बेत करून ठेवणारे प्रवासी ईच्छा नसून देखिल हजारो रुपये दलालांच्या हातात घालतात. त्यानंतर त्याला कन्फर्म तिकिट मिळते. रेल्वे तिकिटांची काळाबाजारी करून प्रवाशांना वेठीस धरण्याचा हा प्रकार नेहमीचाच आहे. कारवाईचे अधिकार असणारांपैकी अनेकांना त्याची माहिती असते. मात्र, ते माैनीबाबांची भूमीका वठवितात. अधून मधून कुण्या दलालाकडे छापा घातला जातो अन् त्याच्याकडून रेल्वेच्ाय तिकिट, कॉम्पयुटर, लॅपटॉप, मोबाइल तसेच रोख रक्कमही जप्त केली जाते. मात्र, बहुतांश वेळी कारवाईबाबत कमालीची गोपनियता राखली जाते. त्रोटक माहिती देऊन कारवाई दडपली जाते. एखाद्यालाच आरोपी बनविले जाते. गेल्या १० दिवसांत आरपीएफने रेल्वे तिकिटांची काळाबाजारी करणाऱ्यांकडे छापे मारले. तीन मोठ्या कारवाया झाल्या. मात्र, यातीनही कारवायांबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती देण्याचा उत्साह दाखवला नाही.
विशेष म्हणजे, हीच मंडळी चार-दोन किलो गांजा रेल्वेत पकडला तर त्याची दोन दोन ठिकाणांहून भली मोठी प्रेसनोट आपल्या नावांसह प्रसारमाध्यमांकडे पाठवितात. तिकिटांच्या काळाबाजारीच्या करवाईबाबत मात्र ते गोपनियता का बाळगतात, ते कळायला मार्ग नाही.
विमानतळाच्या रेल्वे रिझर्वेशन काऊंटरवर १२ मे रोजी सीआयबीच्या पथकाने कारवाई करून एका आरोपीला अटक केली. दोन दिवस कारवाई चालली. त्यानंतर त्याच्याकडून ८३९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई संबंधितांनी आढेवेढे घेत सांगितली.
रेल्वे तिकिटांचा काळा बाजार करणाऱ्या प्रोफेसर कॉलनीतील प्रवीण झाडे नामक आरोपीकडे १३ मे रोजी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) छापा घातला. या छाप्यात आरपीएफला दोन लॅपटॉप, मोबाइल तसेच ५५ लाइव्ह तिकिटांसह ८५ लाख रुपयांचा मुद्देमाल मिळाला. याप्रकरणी सविस्तर माहिती देण्याची तसदी मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी घेतली नाही.
तिसरी कारवाई १६ मे रोजी आरपीएफच्या पथकानेच केली. रेल्वे तिकिटांची काळाबाजारी करणाऱ्या एका आरोपीला अटकही केली. मात्र, त्याचे नाव काय, गाव काय, त्याच्याकडून किती तिकिटा अन् कोणता ऐवज जप्त करण्यात आला. या संबंधाने वारंवार विचारणा करूनही पत्रकारांना माहिती कळणार नाही, याची संबंधित अधिकाऱ्यांनी पुरेपुर काळजी घेतली.