काय म्हणता... रेल्वे ट्रॅफिक सुरू अन् नदीवरच्या पुलाच्या बॉटम प्लेटसही बदलविल्या
By नरेश डोंगरे | Updated: November 18, 2024 21:37 IST2024-11-18T21:36:40+5:302024-11-18T21:37:15+5:30
मध्य रेल्वेत पहिलाच प्रयोग : नवी उपकरणे, नव्या तंत्रज्ञानाचा वापर

काय म्हणता... रेल्वे ट्रॅफिक सुरू अन् नदीवरच्या पुलाच्या बॉटम प्लेटसही बदलविल्या
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : नव्या तंत्रज्ञानाचा आणि उपकरणांचा वापर करून रेल्वेच्या अभियंत्यांनी रेल्वे गाड्यांची ये-जा सुरू असताना नदीच्या पुलावरील बॉटम बेअरिंग प्लेटस बदलविल्या. मध्य रेल्वेच्या ईतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचे काम नागपूर विभागातील वर्धा नदीच्या पुल क्रमांक ७२७/ १ (ओआरएन-२)वर करण्यात आले.
वर्धा - बडनेरा रेल्वे मार्गावरच्या नदीवर असलेल्या या पुलाचा स्पॅन १२ मीटर आणि १८.३० मीटर आहे. या ट्रॅकसाठी उपयोगात येणाऱ्या जुन्या बॉटम बियरिंग प्लेट्स वाकल्या होत्या. अन्य उपकरण आणि साहित्याची स्थितीही खराब झाली होती. त्यामुळे दोन वर्षांपासून या कामासाठी नियोजन विचारविमर्श सुरू होता. या मार्गावर रेल्वे गाड्यांची मोठी वर्दळ असल्याने काम कधी आणि कसे करायचे, असा प्रश्न होता. मात्र, रेल्वेकडे आलेली अत्याधुनिक उपकरणे आणि नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करीत हे काम करण्याचे ठरविण्यात आले. रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेची कमी वर्दळ असलेली वेळ निवडण्यात आली. गार्डर्स उचलण्यासाठी आणि नवीन बियरिंग्स बसवण्यासाठी सिंक्रोनाइज्ड जैक्सचा वापर करून पुलावरच्या ४८ बॉटम बियरिंग प्लेट्स बदलण्यात आल्या तसेच बेड ब्लॉक पृष्ठभागाचे पुनर्निर्माण करण्यात आले. अशा प्रकारे करण्यात आलेले मध्य रेल्वेच्या विभागातील हे पहिलेच आव्हानात्मक काम असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
गाड्या सुरूच होत्या. मात्र...
विशेष म्हणजे अवघ्या दोन तासात हे काम पूर्ण करण्यात आले. त्यासाठी या वेळेत पुलावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचा ब्लॉक करण्याऐवजी प्रत्येक गाडीचा वेग प्रति तास ३० किलोमिटर पेक्षा जास्त राहणार नाही, असे लोको पायलटला सांगण्यात आले होते.