रेल्वेचे ट्रॅफिक सुरू अन् बेड ब्लॉकही बदलला; कळंभा आमला नजिक रेल्वे पुलाचे काम यशस्वी
By नरेश डोंगरे | Published: March 1, 2024 10:46 PM2024-03-01T22:46:21+5:302024-03-01T22:47:03+5:30
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कळंभा नजिकच्या पुलावर आज हे काम पूर्ण करण्यात आले.
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: रेल्वेची वाहतूक बंद न करता नव्या तंत्रज्ञानाचा वापर करीत मध्य रेल्वेतील अभियंत्यांनी क्रॅक झालेल्या रेल्वेच्या पुलावरील काँक्रिटचे आवरण (बेड ब्लॉक) यशस्वीरित्या बदललले. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील कळंभा नजिकच्या पुलावर आज हे काम पूर्ण करण्यात आले.
गेल्या वर्षी तपासणी करताना आमला जवळच्या तिनखेडा - कळंभा जवळ असलेल्या रेल्वे पुलाला (क्रमांक ९६१/१) भेगा (क्रॅक) गेल्याचे दिसून आले होते. त्याची तातडीने गंभीर दखल घेत दुरूस्तीचे काम प्राधान्याने करण्याचा अहवाल अभियंत्यांनी वरिष्ठांकडे सादर केला. या पार्श्वभूमीवर, मुख्यालयातून संबंधित कामाची मंजूरी मिळताच ९ जानेवारीला कामाला सुरूवात करण्यात आली. काम सुरू असताना रेल्वेची वाहतूक बंद करावी लागेल, असा सर्वसाधारण विचार होता. मात्र, अद्ययावत तंत्रज्ञान आणि नवीन मशिनरीचा वापर करून अभियंत्यांनी वेगावर निर्बंध घालत वाहतूक सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार या पुलाचे काम सुरू करून पुलावरून जाताना रेल्वे गाडीचा वेग १३० ऐवजी ९० किलोमिटर ठेवण्याचे प्रत्येक लोको पायलटला निर्देश देण्यात आले. अशा प्रकारे सावधगिरीचे उपाय करून युद्धपातळीवर काम करत दोन महिन्यात हे काम पूर्ण करण्यात आले.
मध्य रेल्वेच्या नागपूर मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी आज या संबंधाने पुलाची पाहणी केली. पुलाचे काम करणारे अभियंता, अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांच्या काैशल्याचे आज काैतुक करून काम पुलाचे पूर्ण आणि चांगले झाल्याचा निर्वाळा दिला. या कामामुळे संभाव्य धोका टळला आणि पुलाची वयोमर्यादाही वाढल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. हे तंत्रज्ञान ठिकठिकाणच्या पुलांच्या दुरूस्तीसाठी कामी येणार असल्याचेही अधिकारी म्हणतात.