कोळशाच्या व्यवहारात रेल्वेची अवघ्या महिनाभरात कोट्यवधींची कमाई
By नरेश डोंगरे | Published: February 10, 2024 09:26 PM2024-02-10T21:26:17+5:302024-02-10T21:26:38+5:30
माल वाहतुकीतून मध्य रेल्वे मालामाल.
नागपूर : कोळशाच्या व्यवहारात हात काळे, अशी एक म्हण आहे. मात्र, मध्य रेल्वेने त्या म्हणीवर 'कोटी' करत आपली तिजोरी लबालब करून उपरोक्त म्हण खोटी ठरवली आहे. कोळसा वाहतुकीतून अवघ्या महिनाभरात मध्य रेल्वेने तब्बल ४१७.३१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या शिवाय अन्य साहित्य, मालाची ने-आण करून रेल्वे प्रशासन मालामाल झाले.
गेल्या जानेवारी महिन्यात मध्य रेल्वेने कोणकोणत्या साहित्याची, चिजवस्तूंची वाहतुक करून किती रुपयांची कमाई केली, त्याचा अहवाल प्रसिद्धीला दिला आहे. त्यानुसार, जानेवारी २०२४ या एका महिन्यात मध्य रेल्वेने तब्बल १०१५ रॅक कोळशाची वाहतूक केली. त्यातून रेल्वेला ४१७.३१ कोटी रुपयांचा घसघशीत महसुल मिळाला. गेल्या वर्षी याच महिन्यात मध्य रेल्वेने ९८४ रॅक कोळसा लोड करून ३९७.२८ कोटी रुपये मिळवले होते. त्या तुलनेत यंदाच्या जानेवारी महिन्यांची कमाई ५ टक्के जास्त आहे.
कोळशाप्रमाणेच रेल्वेने गेल्या महिन्यात लोहखनिजाच्या ४६ रॅक लोड करून ३६. ६ कोटी रुपये मिळवले. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात ही कमाई केवळ १.५४ कोटी रुपये होती. सिमेंटच्या २३ रॅक लोड करून १८ . १ कोटी रुपये मिळवले तर क्लिंकरच्या २३ रॅकची वाहतूक करून १२.२ कोटीची कमाई केली आहे.
साखरेने दिले १.२३ कोटी
अशाच प्रकारे रेल्वेने डीओसी, डोलोमाईट, फ्लाय ॲश, फेरो मॅगनिज आणि लष्करासाठी लागणाऱ्या अन्य साहित्याची वाहतूक करून सुमारे १२ कोटी रुपयांची कमाई केली. साखरेच्या ४ रॅकची वाहतूक करून रेल्वेने १.२३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात रेल्वेने साखर वाहतुकीतून केवळ ४७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले होते.