तिकिट चेकिंग मोहिमेतून रेल्वेला मालामाल लॉटरी वर्षभरात पावणेपाच लाख प्रकरणे : २८ कोटींपेक्षा जास्तचे उत्पन्न
By नरेश डोंगरे | Updated: April 3, 2025 20:13 IST2025-04-03T20:13:20+5:302025-04-03T20:13:48+5:30
बेशिस्त आणि फुकट्या प्रवाशांना वठणीवर आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून गेल्या वर्षभरात विविध रेल्वे गाड्यांमध्ये राबविण्यात आलेल्या तिकिट तपासणीच्या विशेष मोहिमेतून रेल्वेला मालामाल लॉटरी लागली आहे.

तिकिट चेकिंग मोहिमेतून रेल्वेला मालामाल लॉटरी वर्षभरात पावणेपाच लाख प्रकरणे : २८ कोटींपेक्षा जास्तचे उत्पन्न
नरेश डोंगरे
नागपूर : बेशिस्त आणि फुकट्या प्रवाशांना वठणीवर आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून गेल्या वर्षभरात विविध रेल्वे गाड्यांमध्ये राबविण्यात आलेल्या तिकिट तपासणीच्या विशेष मोहिमेतून रेल्वेला मालामाल लॉटरी लागली आहे. २८ कोटींपेक्षा जास्त महसूल मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला प्राप्त झाला आहे. हा आतापर्यंतच्या कमाईचा उच्चांक असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी म्हटले आहे.
तिकिट न घेताच रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करणे, जनरलचे तिकिट काढून एसीत बसणे, सोबत असलेल्या साहित्याचे (लगेज) तिकिट न काढणे, असा प्रकार अवलंबणाऱ्या बेशिस्त प्रवाशांना वठणीवर आणण्यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने विविध मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्या तसेच ठिकठिकाणची रेल्वे स्थानके आदी ठिकाणी एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत विशेष तिकिट तपासणी मोहिम राबविली. यात एकूण ४ लाख, ७४ हजार, ४१२ बेशिस्त प्रवासी तिकिट चेकरच्या हाती लागले. त्यातून रेल्वेच्या तिजोरीत २८ कोटी, १६ लाख, ३३ हजार, ६६३ रुपयांची गंगाजळी जमा झाली.
सर्वाधिक वसुली फुकट्यांकडून
तिकिट तपासणीमध्ये वर्षभरात २ लाख, ५७हजार, २५ फुकटे प्रवासी टीसींच्या हाती लागले. या प्रवाशांकडे कुठलेही तिकिट नसताना ते रेल्वेतून प्रवास करीत होते. त्यांच्याकडून टीसींनी १० कोटी, २८ लाख रुपये तिकिट भाडे आणि ६ कोटी, ८८ लाख दंड वसूल केला.
तिकिट जनरलचे, प्रवास एसी कोचमधून !
जनरलचे तिकिट घेऊन खुशाल एसी कोचमध्ये प्रवास करणारे २ लाख, १२ हजार, ६९८ प्रवासी तिकिट चेकर्सना आढळले, त्यांच्याकडून ५ कोटी, ४७ लाखांचे भाडे आणि ५ कोटी, ४२ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे लगेजची बुकिंग न करणारे ४, ६८९ प्रवासी आढळले. त्यांच्याकडून ८ लाख, ६० हजारांचे भाडे शुल्क आणि ४ लाख, ७४ हजारांचा दंड घेण्यात आला.
तिकिट घ्या अन् प्रवास करा
रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करताना कुणीही विनातिकिट प्रवास करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना केले आहे. ज्या श्रेणीचे तिकिट असेल त्याच श्रेणीच्या डब्यातून प्रवास करा आणि सोबत सामान असेल तर त्याचीही रितसर बुकिंग करा. असे न केल्यास अतिरिक्त शुल्क आणि दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा ईशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे.