दिवाळीनंतरही रेल्वे हाऊसफुल, अनेक गाड्यांना अतिरिक्त कोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2022 02:36 PM2022-10-31T14:36:53+5:302022-10-31T14:52:38+5:30
१३ गाड्यांमध्ये सुविधा, गर्दीवर नियंत्रण; प्रवाशांना दिलासा
नागपूर : दिवाळीपूर्वी वाढलेली रेल्वेगाड्यांची गर्दी दिवाळीनंतरही ‘जैसे थे’च आहे. परिणामी, प्रवाशांना रेल्वेत जागा मिळेनाशी झाली आहे. ते लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विविध मार्गावर धावणाऱ्या १३ रेल्वेगाड्यांना अतिरिक्त कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होऊन त्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
दिवाळीपूर्वीच्या एक आठवड्याअगोदरपासून रेल्वेत प्रवाशांची मोठी गर्दी वाढते. ती वाढतच जाते. दिवाळी, भाऊबीज, छठपूजा असे विविध सण असल्याने प्रवाशांचे इकडून तिकडे, तिकडून इकडे जाणे-येणे सुरूच आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांमधील गर्दी कमी व्हायचे नाव घेत नाही. आरक्षण तर सोडा, जनरलमध्येही पाय ठेवायला जागा मिळत नसल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. ते लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने वेगवेगळ्या गाड्यांना अतिरिक्त कोच जोडून प्रवाशांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ट्रेन नंबर १५२३१ बरोनी गोंदिया एक्स्प्रेसला १ ते ६ नोव्हेंबरपर्यंत, १५२३२ गोंदिया बरोनी एक्स्प्रेसला २ ते ७ नोव्हेंबरपर्यंत एक अतिरिक्त स्लीपर कोच जोडला जाणार आहे.
१७००७ सिकंदराबाद दरभंगा एक्स्प्रेसला १ ते २९ नोव्हेंबर, १७००८ दरभंगा - सिकंदराबाद एक्स्प्रेसला ४ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत दोन अतिरिक्त स्लिपर कोच जोडले जाणार आहेत. १८२३७ कोरबा अमृतसरला १ ते ३० नोव्हेंबर आणि १८२३८ अमृतसर कोरबा एक्स्प्रेसला ३ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत एक स्लिपर कोच, २०८४३ बिलासपूर भगत की कोटी एक्स्प्रेसला १ ते २९ नोव्हेंबर, २०८४४ भगत की कोटी - बिलासपूर एक्स्प्रेसला ५ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरपर्यंत एक थर्ड एसी कोच लावला जाणार आहे. २०८४५ बिलासपूर बिकानेर एक्स्प्रेसला ३ ते २६ नोव्हेंबर, तर २०८४६ बिकानेर बिलासपूरला ६ ते २९ नोव्हेंबरपर्यंत थर्ड एसी कोच उपलब्ध करून दिला जाणार आहे.
तर गर्दी कमी होईल
१८२३९ कोरबा ईतवारी शिवनाथ एक्स्प्रेसला १ ते ३० नोव्हेंबरपर्यंत, तर १८२४० ईतवारी कोरबा शिवनाथ एक्स्प्रेसला२ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत स्लिपर कोच आणि ट्रेन नंबर १२८५६ ईतवारी बिलासपूर ईतवारी इंटरसिटी एक्स्प्रेसला २ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत अतिरिक्त स्लिपर कोच लावला जाणार आहे. या सुविधेमुळे रेल्वेतील प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि प्रवाशांनाही दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.