पाऊस बरसला; शेतकरी सुखावला
By admin | Published: June 25, 2016 02:52 AM2016-06-25T02:52:23+5:302016-06-25T02:52:23+5:30
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर शुक्रवारी संपूर्ण जिल्ह्यात दमदार पाऊस बरसला. या पावसाने चिंताग्रस्त झालेला शेतकरी सुखावला असून, तो आता पेरणीच्या तयारीला लागला आहे.
पेरणीला सुरुवात : नागपुरात ६.७ टक्के पाऊस
नागपूर : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर शुक्रवारी संपूर्ण जिल्ह्यात दमदार पाऊस बरसला. या पावसाने चिंताग्रस्त झालेला शेतकरी सुखावला असून, तो आता पेरणीच्या तयारीला लागला आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच आकाशात ढगाळ वातावरण तयार झाले होते. यात सकाळी ९ वाजतापासून पावसाला चांगलीच सुरुवात झाली. यानंतर तो साधारण दोन तास बरसला.
नरखेड तालुक्यातील भिष्णूर व सावरगावसह काटोल तालुक्यातील कचारीसावंगा, रिधोरा, कोंढाळी व येनवा परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तसेच कळमेश्वर तालुक्यातील लोणारा, मोहपा, धापेवाडा आणि सावनेर तालुक्यातील पिपळा (डाकबंगला), इसापूर, खापरखेडा, गोसेवाडी, वेलतूर, खापा (पाटण), वलनी, सिल्लेवाडा, पारशिवनी तालुक्यातील दहेगाव (जोशी) व कन्हान आणि मौदा तालुक्यातील तारसा, धानला परिसरात चांगला पाऊस बरसला. त्याचवेळी भिवापूरसह नांद व उमरेड परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले, मात्र, पाऊस आला नाही.
विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसह कृषी विभागाची चिंता वाढली होती. यामुळे २३ जूनपर्यंत संपूर्ण विभागात केवळ ५ टक्के पेरण्या आटोपल्या होत्या. आतापर्यंत वर्धा जिल्ह्यात सर्वांधिक म्हणजे, ४७.१ टक्के पाऊस झाला असून, त्यापाठोपाठ नागपूर जिल्ह्यात ३१.१ टक्के, भंडारा १४.८ टक्के, गोंदिया ३०.८ टक्के, चंद्रपूर २४ टक्के व गडचिरोली जिल्ह्यात ४५.१ टक्के पाउस पडला आहे. (प्रतिनिधी)
२८ जूनपर्यंत दमदार पाऊस
मान्सून विदर्भात दाखल झाला असला तरी अजूनपर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नाही. परंतु मागील दोन दिवसांपासून संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून, हवामान खात्याने पुढील २८ जूनपर्यंत नागपूरसह संपूर्ण जिल्ह्यात दमदार पावसाचे संकेत दिले आहे. वास्तविक २३ जूनपर्यंत विभागात किमान १४३.८ मिमी. पाऊस पडणे अपेक्षित असते. मात्र यंदा केवळ ३१.४ मिमी. (२१ टक्के) पाऊस पडला आहे. ही आकडेवारी फारच अल्प असून, यामुळे संपूर्ण विभागातील पेरण्या खोळंबल्या होत्या. परंतु शुक्रवारच्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.