विद्यार्थ्यांवर गुणांचा ‘पाऊस’: नागपूर जिल्ह्याचा निकाल २२ टक्क्यांनी वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 11:23 PM2020-07-29T23:23:14+5:302020-07-29T23:24:27+5:30
‘कोरोना’च्या प्रकोपामुळे अगोदरच निकालाला उशीर झाला असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये तणावाचे वातावरण होते. मात्र बुधवारी निकाल जाहीर झाला अन् विद्यार्थ्यांवर गुणांचा अक्षरश: वर्षावच झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’च्या प्रकोपामुळे अगोदरच निकालाला उशीर झाला असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये तणावाचे वातावरण होते. मात्र बुधवारी निकाल जाहीर झाला अन् विद्यार्थ्यांवर गुणांचा अक्षरश: वर्षावच झाला. नागपूर विभागासह जिल्ह्याच्या निकालातदेखील सुधारणा झाली. यंदा जिल्ह्याचा निकाल चक्क ९४.६६ टक्के इतका लागला आहे. मागील वर्षी हाच निकाल ७१.७४ टक्के इतका लागला होता. यंदा निकालात २२.९२ टक्क्यांची वाढ झाली आहे.
यंदाही उपराजधानीत उत्तीर्णांमध्ये विद्यार्थिनींचाच वरचष्मा दिसून आला. जर विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त गुणासह टक्केवारी लक्षात घेतली तर साऊथ पॉर्इंट शाळेची विद्यार्थिनी हिमाश्री गावंडे हिला १०० टक्के गुण मिळाले आहेत. यात संगीताच्या ८ गुणांचादेखील समावेश आहे. याशिवाय कुठलेही अतिरिक्त गुण न पकडता जे.पी. इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी समिक्षा पराते हिला ९९.४० टक्के गुण प्राप्त झाले आहेत. सोमलवार हायस्कूल (निकालस) येथील वरेण्य पौनीकर या विद्यार्थ्याला क्रीडा गुणांसह ९९.८ टक्के तर तेथीलच राधिका गभने हिला अतिरिक्त गुणांसह ९९.४ टक्के गुण मिळाले आहेत. सोमलवार हायस्कूल (रामदासपेठ) येथील विद्यार्थिनी जुई क्षीरसागर हिला ९९.२० टक्के गुण प्राप्त झाले.
नागपूर जिल्ह्याच्या आकडेवारीकडे नजर टाकली तर ३० हजार ३२१ पैकी २९ हजार २३१ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९६.४१ टक्के इतके आहे. तर जिल्ह्यातून ९२.९५ टक्के मुले उत्तीर्ण झाली.
शहरात टक्के उत्तीर्ण
नागपूर शहरात १८ हजार १०४ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली. त्यापैकी १७ हजार ५१२ म्हणजेच ९६.७३ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. तर १७ हजार ६१३ पैकी १६ हजार ४२५ (९३.२५ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शहरातील एकूण उत्तीर्णांचे प्रमाण हे ९५.०२ टक्के इतके आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही टक्केवारी २०.७५ टक्क्यांनी अधिक आहे.
जिल्ह्यातील उत्तीर्णांची टक्केवारी
सहभागी उत्तीर्ण टक्केवारी
विद्यार्थी ३१,०८६ २८,८९५ ९२.९५
विद्यार्थिनी ३०,३२१ २९,२३१ ९६.४१
एकूण ६१,४०७ ५८,१२६ ९४.६६
हिमांशु बोकडे दिव्यांगांमधून ‘टॉप’
शाळांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार कुर्वेज न्यू मॉडेल हायस्कूलचा विद्यार्थी हिमांशु बोकडे हा ९२ टक्के गुणांसह प्रथम आला आहे तर याच शाळेची वेदिका गेडाम हिला ८९ टक्के गुण प्राप्त झाले आहेत. आदित्य पाटील याला ८७ टक्के गुण मिळाले.