नागपुरात रात्री पाऊस, वातावरणात गारवा : शेतकरी चिंतेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 11:24 PM2021-01-28T23:24:09+5:302021-01-28T23:26:06+5:30
Rain in Nagpur at night हवामान केंद्राने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार २८ जानेवारीला रात्री अखेर पाऊस आला. मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर हवेमध्ये रात्री पुन्हा गारवा वाढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हवामान केंद्राने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार २८ जानेवारीला रात्री अखेर पाऊस आला. मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर हवेमध्ये रात्री पुन्हा गारवा वाढला.
पूर्व विदर्भातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. गुरुवारी सकाळी बहुतेक भागात वातावरण ढगाळलेले होते. सकाळी १० वाजेपर्यंत सूर्यदर्शनही झाले नाही. मात्र त्यानंतर वातावरण निवळले. दिवसा कुठेही पावसाची नोंद झाली नाही. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास मात्र नागपुरात पावसाने हजेरी लावली. काही मिनिटे आलेल्या या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा पसरला. हा पाऊस शेतकऱ्यांची चिंता वाढविणारा ठरला आहे. हरभरा, गहू या पिकांसाठी नुकसानकारक असलेल्या या पावसामुळे आंबिया बहाराचेही अधिक नुकसान होते. आता कुठे आंब्याला बहर आला आहे. मात्र पहिल्याच बहरात पाऊस आल्याने तो गळण्याची शक्यता असल्याचे आंब्याच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता अधिक आहे. या सोबतच वांगी, फुलकोबी, पत्ताकोबी या प्रकारच्या भाजीपाल्यावर किडींचा प्रकोप वाढण्याची शक्यताही या वातावरणामुळे वाढली आहे.
हवामान खात्याच्या नोंदीनुसार, गेल्या २४ तासात नागपुरात किमान तापमान १५.७ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३०.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. गोंदियातील तापमानात कालच्यापेक्षा वाढ झाली असली तरी येथे पारा १४ अंशावर नोंदविण्यात आला. विदर्भात चंद्रपुरातील तापमान अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक असल्याची नोंद घेण्यात आली. तिथे कमाल तापमान ३२ .४ अंश तर किमान तापमान १८.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.
नागपुरातील वातावरणात मागील आठवड्यापासून कमी अधिक बदल जाणवत आहे. शहरात गुरुवारी सकाळी आर्द्रता ६९ टक्के होती. तर सायंकाळी ती ५८ टक्के नोंदविण्यात आली. शहरातील दृष्यता २ ते ४ किलोमीटर होती.