नागपुरात पावसाचा फटका, २७ तासापर्यंत वीज गुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 09:04 PM2021-06-09T21:04:58+5:302021-06-09T21:05:59+5:30
Rain effect power outage, Nagpur news
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मंगळवारी दुपारी आलेल्या वादळी पावसानेे शहरातील वीज वितरण यंत्रणा मान्सूनसाठी किती तयार आहे, याची पोलखोल केली. अनेक वस्त्या रात्रभर अंधारात होत्या. बुधवारी सायंकाळी ५ वाजता वीज पुरवठा सुरळीत झाला. म्हणजेच तब्बल २७ तासापर्यंत वीज गुल होती.
मान्सूनपूर्व पावसानेच महावितरणची दैना उडविली. त्यामुळे दर आठवड्याला महावितरण जी मान्सूनपूर्व मेंटेनन्स करीत असते त्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशीच अवस्था असेल तर महावितरणने दर आठवड्याला मेंटेनन्सच्या नावावर वीज बंद करायला हवी, असे नागरिकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे मंंगळवारच्या पावसाने मोठे नुकसान झाले, त्यामुळे दुरुस्तीसाठी वेळ लागल्याचा दावा महावितरणने केला आहे.
मंगळवारी दुपारी आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने अनेक झाडे कोलमडून पडली. कित्येक झाडे विजेच्या तारांवर पडली. काही झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर पडल्या. वादळामुळे विजेचे खांब आडवे झाले. जवळपास साडेआठ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला. झाडे किंवा झाडांच्या फांद्या पडल्याने त्रिमूर्तीनगर, टेलिकॉमनगर, गोपालनगर, सुभाषनगर, कामगार कॉलनी, जयप्रकाशनगर, गायत्रीनगर, नवनिर्माण सोसायटी, रविनगर, एकात्मतानगर या वस्त्यांमधील वीज गेली. महावितरणने केलेल्या दाव्यानुसार कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करीत बहुतांश भागातील वीज पुरवठा रात्री १०.३० वाजेपर्यंत सुरळीत केला. परंतु भामटी, काॅर्पोरेशन कॉलनी, कामगार कॉलनी, डागा ले- आऊट यासारख्या भागात रात्रभर वीज नव्हती. या भागात तब्बल २७ तासानंतर वीज पुरवठा सुरळीत झाला. दुसरीकडे १५० फ्यूज कॉल (केवळ घर किंवा ठराविक भाग) यांच्याही तक्रारी नोंदविल्या गेल्या. यातील काही फ्यूज कॉल दुरुस्त करण्याचे काम बुधवारीही सुरू होते. महावितरणचे म्हणणे आहे की, अनेक लोकांनी फ्यूज कॉलची तक्रारच केली नाही. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्यास वेळ लागत आहे. ही परिस्थिती महावितरणच्या काँग्रेसनगर डिव्हिजनची आहे, ज्याची तुलना राज्यातील सर्वोत्कृष्ट डिव्हिजनमध्ये केली जाते, हे विशेष.
निष्काळजीपणा मान्य नाही, सर्व दोष हवामानाला
महावितरण दर बुधवारी साप्ताहिक मेंटेनन्सच्या नावावर वीज बंद ठेवते. यादरम्यान पावसाळ्यात वीज तारांवर झाडांच्या फांद्या पडून वीज पुरवठा प्रभावित होऊ नये म्हणून आजूबााजूला असलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटनी केली जात असल्याचे सांगितले जाते. परंतु मंगळवारी ज्याप्रमाणे अनेक झाडांच्या फांद्या वीज तारांवर पडल्याने वीज पुरवठा प्रभावित झाला, त्यावरून ही कामे खरंच केली की नाही, असा प्रश्न पडतो. परंतु महावितरण आपला दोष मान्य करायलाच तयार नाही. सर्व दोष हवामानाचा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
रात्रभर जागून वीज पुरवठा सुरळीत - महावितरण
महावितरणने असा दावा केला आहे की, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी रात्रभर जागून वीज पुरवठा पूर्ववत केला. शहरासोबतच ग्रामीण भागातील वीज पुरवठाही प्रभावित झाला होता. विशेषत: नगरधन परसिरात आठ विजेचे खांब जमीनदोस्त झाले होते, तर तन विजेचे खांब आडवे झाले. यामुळे १५ गावे अंधारात बुडाली. कार्यकारी अभियंता रूपेश टेंभुर्णे यांच्या मार्गदर्शनात उपकार्यकारी अभियंता आशिष तेजे, सहायक अभियंता प्रणय कावळे, पारितोषिक आगरकर यांनी युद्धस्तरावर काम करून बुधवारी सकाळपर्यंत वीज पुरवठा सुरळीत केला.