पाऊस मुक्कामी, नदी-नाल्यांना पूर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:06 AM2021-07-24T04:06:46+5:302021-07-24T04:06:46+5:30
- सावनेर, कळमेश्वर तालुक्यात नुकसान, आषाढधारांनी शेतकरी सुखावला - लहान पुलामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला नागपूर : आषाढी एकादशीच्या ...
- सावनेर, कळमेश्वर तालुक्यात नुकसान, आषाढधारांनी शेतकरी सुखावला
- लहान पुलामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला
नागपूर : आषाढी एकादशीच्या पर्वावर दाखल झालेला पाऊस सध्या जिल्ह्यात मुक्कामी आहे. जिल्ह्यात गत दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे शेतकरी सुखावला आहे तर बहुतांश तालुक्यात नदी-नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यात शुक्रवारीही पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात सांयकाळपर्यंत सरासरी ५९.४३ मि.मी. पाऊस झाला. सावनेर तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. तालुक्यात ९२ गावातील ३०७४ हेक्टर क्षेत्रात पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्ह्यात गुरुवारपर्यंत सरासरी ४१३.२१ मिमी पावसाची नोंद झाली.
गुरुवारी सर्वदूर पाऊस असला तरी नागपूर ग्रामीण, नरखेड, मौदा तालुक्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही. दोन दिवस आलेल्या पावसामुळे कळमेश्वर तालुक्यात चंद्रभागेसह सर्वच लहान-मोठ्या नद्यांना पूर आला. चंद्रभागा नदीला आलेल्या पुरामुळे धापेवाडा (बु) आणि धापेवाडा (खुर्द) या दोन गावांचा संपर्क तुटला होता. तालुक्यातील नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक घरात पाणी शिरले तर शेतात काम करणारे मजूर, शेतकरी, जनावरे अडकून पडली होती. तसेच काही मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. झुनकी जवळील पुलावरील काँक्रीट वाहून गेल्यामुळे पुलाच्या पायल्या उघड्या पडल्या आहेत. नदीनाल्याच्या काठावरील शेतजमीन पुरामुळे खरडून गेल्याने शेतमालाचे नुकसान झाले आहे.
सावनेर तालुक्यात गुरुवारी कोलार नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील झोपड्यात पाणी शिरले होते. नदीकाठावरील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आला. तालुक्यातील उमरी येथे पुराचे पाणी गावातील घरात शिरल्याने अनेकांचे धान्य भिजले. यासोबतच शिवारातील शेतांना तलावाचे स्वरुप आले आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यातही पुरामुळे लहान पुलावरील वाहतूक शुक्रवारी दुपारपर्यंत विस्कळीत राहिली.
साधारणत: जिल्ह्यात १ जून ते २३ जुलैपर्यंत सरासरी ३९९.३३ मिलीमीटर इतका पाऊस झाल्याची नोंद आहे. यंदा ही नोंद ४७२.६५ मि.मी.इतकी झाली. ती सरासरीच्या १८ टक्के जास्त आहे. संततधार पावसामुळे वातावरणात थंडावा आल्याने नागरिकांनाही उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात दरवर्षी १ जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत सरासरी ९७६.७७ मि.मी. इतका पाऊस पडतो. यंदा जिल्ह्यात मान्सूनचे वेळेत आगमन झाल्याने शेतकऱ्यांनी खरिपांच्या पेरण्या याच महिन्यात पूर्ण केल्या होत्या; मात्र गत पंधरा दिवस पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.
एकाचा मृत्यू तर दोघे जखमी
गुरुवारी झालेल्या पावसामुळे नागपूर ग्रामीण तालुक्यात बोखारा परिसरात एका अज्ञात इसमाचा मृत्यू झाला तर कळमेश्वर तालुक्यात झाड कोसळल्याने दोघे जखमी झाले. बोखारा नजीकच्या तुली कॉलेजच्या बाजूला असलेल्या नालीत अंदाजे ६० वर्ष वयोगटातील एक अज्ञात इसम बुडालेल्या अवस्थेत आढळला. तो कचरा वेचणारा किंवा भिकारी असावा. या व्यक्तीच्या शरीरावर कुठलीही दुखापत नसल्याने पावसामुळे नालीत पडून त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज कोराडी पोलिसांनी व्यक्त केला आहे. कळमेश्वर तालुक्यातील तेलगाव येथे पावसापासून बचाव करण्यासाठी रामराव कैकाडे (५०) व कृपाकर हिवरकर (३५) यांनी ऑटोचा आधार घेतला होता; परंतु वादळी वाऱ्यामुळे झाड ऑटोवर कोसळल्याने ते दोघे जखमी झाले.