जिल्ह्यात वादळासह पाऊस; वीज पडून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:08 AM2021-05-19T04:08:22+5:302021-05-19T04:08:22+5:30
नागपूर : सायंकाळी आलेल्या वादळ व पावसाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात कहर केला. गुमगाव येथील एका शेळीपालकाचा वीज पडून मृत्यू ...
नागपूर : सायंकाळी आलेल्या वादळ व पावसाने जिल्ह्यातील ग्रामीण भागात कहर केला. गुमगाव येथील एका शेळीपालकाचा वीज पडून मृत्यू झाला. काटोल तालुक्यातील गावांमधील घरांचे पत्रे आणि छप्पर वादळात उडाले. कोंढाळी तालुक्यालाही वादळासह पावसाने तडाखा दिला. नागपूर शहरासह अन्य तालुक्यांमध्येही वादळासह जोराचा पाऊस आल्याने आंब्याचे प्रचंड नुकसान झाले.
गुमगाव येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी आलेल्या वादळ व पावसात तेथील वाहाब राज मोहम्मद शेटे (६३) यांचा वीज पडून मृत्यू झाला. कोतेवाडा शिवारात ते आपल्या शेळ्यांना चराईसाठी घेऊन गेले असता, सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जोरदार वादळ व गडगडाटासह झालेल्या पावसात ही घटना घडली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी आहे. हेड कॉन्स्टेबल अरविंद घिये, विनोद देशमुख, मंगेश मापारी यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा ग्रामीण रुग्णालयात मृतदेह पाठविला.
काटोल तालुक्याला सायंकाळी वादळासह पावसाने जोरदार तडाखा दिला. अनेक घरांचे पत्रे उडाले. यामुळे गावकरी भयभीत झाले होते. वादळात झाडांच्या फांद्याही मोडून पडल्या. कोंढाळी तालुक्यातही वादळ व पावसाने घरांचे आणि आंब्याच्या बागांचे नुकसान केले. रामटेक, नरखेड तालुक्यातही वादळासह पावसाने हजेरी लावली. यामुळे आंब्याचे आणि भाजीपाला पिकांचे बरेच नुकसान झाले.
मंगळवारी नागपूरसह ग्रामीण भागात दुपारी कडक उन्ह पडले. तरीही उकाडा चांगलाच जाणवत होता. सायंकाळी वातावरण बदलले आणि वादळासह पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने नागपूरसह अन्य जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. अन्य जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस वर्तविला आहे. तर, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, अकोला बुलडाणा येथे १९ आणि २० मे हे दोन दिवस विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविली आहे.
...
नागपूरकरांना उकाड्यावर पावसाची मात्रा
दोन दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या नागपूरकरांना मंगळवारी सायंकाळी पावसाने गारव्याची मात्रा दिली. सुमारे २० मिनिटे आलेल्या जोराच्या पावसामुळे वातावरण थंडावले. काही काळ जोराचा वाराही सुटला. मात्र नुकसानाचे वृत्त नाही. दिवसभराचे तापमान ४०.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. आर्द्रता सकाळी ६९ टक्के होती, सायंकाळी आलेल्या पावसानंतर ९६ टक्के नोंदविली गेली.
...
चंद्रपूरचे तापमान सर्वाधिक
मंगळवारी सर्वाधिक तापमान चंद्रपूरचे ४१.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. वाशिम आणि अमरावतीमध्ये ३७.६, बुलडाणा ३७.७, अकोला ३८.४, गडचिरोली ३८.६, यवतमाळ आणि गोंदियात ३९ तर वर्धा येथे ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गोंदियात मागील २४ तासात ३.६ मिली पाऊस पडला.
...