पावसाची ‘समर’ एन्ट्री !
By admin | Published: March 28, 2016 02:51 AM2016-03-28T02:51:04+5:302016-03-28T02:51:04+5:30
मार्च महिना संपायला आला असून, उन्हाचे चटके बसू लागले आहेत. शिवाय विदर्भातील पारा ४० च्या वर गेला आहे.
नागपूर : मार्च महिना संपायला आला असून, उन्हाचे चटके बसू लागले आहेत. शिवाय विदर्भातील पारा ४० च्या वर गेला आहे. त्याचवेळी रविवारी अचानक पावसाने ‘समर’ एन्ट्री करून, सर्वांना गरमीपासून अल्पसा सुखद दिलासा दिला आहे. या अवकाळी पावसाने विदर्भातील चढलेला पारा अचानक खाली घसरला आहे. रविवारी सकाळपासूनच आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली होती. त्यात सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान शहरातील काही भागात चांगलाच पाऊस झाला तर काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या. याशिवाय विदर्भातील इतरही काही जिल्ह्यात पाऊस झाल्याची माहिती आहे. यात उपराजधानीत रात्री ८.३० वाजतापर्यंत २ मिमी. पावसाची नोंद करण्यात आली.
हवामान खात्याच्या मते, सध्या राजस्थान, उत्तर पश्चिम मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश व झारखंडमधील काही भागात अपर एअर सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे. त्याचाच विदर्भावर परिणाम होऊन ही स्थिती निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे रविवारी नागपुरातील तापमान ३९.८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरले आहे. शिवाय सायंकाळी झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. (प्रतिनिधी)