नागपूर जिल्ह्यात १६ फेब्रुवारीला पावसाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 11:23 AM2021-02-15T11:23:24+5:302021-02-15T11:23:52+5:30
Nagpur News १६ तारखेला तुरळक आणि १७ व १८ तारखेला बहुतेक ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता वर्तविली आहे. काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय हवामान विभागाच्या येथील प्रादेशिक हवामान केंद्राने जिल्ह्यात १६ फेब्रुवारीला पावसाचा इशारा दिला आहे. १६ तारखेला तुरळक आणि १७ व १८ तारखेला बहुतेक ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता वर्तविली आहे. काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पिकांची काढणी सुरू आहे. काही ठिकाणी गहू ओंब्या भरण्याच्या बेतात आहे तर हरभरा आणि इतर पिकेही पक्व होण्याच्या बेतात आहेत. यामुळे काढणीला आलेल्या पिकांच्या रक्षणाचे योग्य नियोजन करावे, हरभरा, तूर, जवस आदी पिकांची योग्य ठिकाणी साठवणूक करावी, असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.
कापसाची राहिलेली वेचणी, भाजीपाला पिके, संत्रा, मोसंबी, लिंबू आदी फळबागांमध्ये पाण्याचा निचरा होईल, अशी योजना करावी, असा सल्लाही देण्यात आला आहे.
या काळात विजेचा धोका असल्याने शेतावर किंवा मोकळ्या ठिकाणी काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी तसेच शेतमजुरांनी योग्य ती काळजी घ्यावी, पाण्यापासून सुरक्षित ठिकाणी आसरा घेताना विजेचीही काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.