नागपुरात नागरिकांनी स्वयंप्रेरणेने केले रेन वॉटर हार्वेस्टिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 11:09 AM2019-07-04T11:09:43+5:302019-07-04T11:14:05+5:30
यंदाच्या उन्हाळ्यात वाडीमधील नागरिकांनी कधी नव्हे एवढी पाण्याची टंचाई अनुभवली. त्या अनुभवातून शहाणे होत वाडीमधील काही नागरिकांनी यंदाच्या पावसाळ्यात पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्याचा निर्धार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यंदाच्या उन्हाळ्यात वाडीमधील नागरिकांनी कधी नव्हे एवढी पाण्याची टंचाई अनुभवली. त्या अनुभवातून शहाणे होत वाडीमधील काही नागरिकांनी यंदाच्या पावसाळ्यात पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्याचा निर्धार केला. वाडी परिसरातील लाईफस्टाईल टाऊनशिपमधील नागरिकांनी रेन वॉटर हार्वेस्टींगचा शास्त्रोक्त मार्ग स्वीकारला. विशेष म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंगचा कोणताही अनुभव नसताना, त्यासाठीचे सर्व नियोजन आणि कार्यवाही नागरिकांनी स्वत: केली.
वाडी परिसरातील अॅटोमिक एनर्जी डेपो रोडवर वसलेल्या लाईफस्टाईल टाऊनशिपमध्ये २२४ फ्लॅट्स आहे. यात एक हजारपेक्षा जास्त लोक निवास करतात. वाडी परिसराला वेणा जलाशयातून पाणीपुरवठा होतो. यावर्षीच्या उन्हाळ्यात जलाशय कोरडा झाला. पाण्याचे बोअरवेलसारखे स्रोत कोरडे पडले. त्यामुळे वाडीमध्ये पाणी खरेदी करून पिण्याची वेळ नागरिकांवर आली होती. ही टंचाई येथील रहिवाशांना पाण्याचे महत्त्व शिकवून गेली.
त्यांनी प्रशासनाला दोष देण्यापेक्षा त्यावर उपाययोजना करण्याचा मानस बाळगला. पावसाचा प्रत्येक थेंब धरणीच्या पोटात साठवला तर पुढील वर्षी संकटकाळी त्या कोट्यवधी थेंबांचा वापर करता येईल, या विचारातून या सोसायटीतील नागरिकांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विचार अंगिकारला.
टंचाईमुळे कळले महत्त्व
सोसायटीतील काही नागरिक यासाठी पुढे आले. त्यांनी इतरांची समजूत घालण्यास सुरुवात केली. एक एक करता २२४ कुटुंबांमध्ये पाणी साठवण्याची एक नवी जागृती निर्माण झाली. सोसायटीच्या तज्ज्ञ मंडळींनीच परिसराचा अभ्यास केला. पाण्याचा प्रवाह कुठून कुठे वाहतो, एका तासाच्या पावसात किती लाख लिटर पाणी वाहून जाते, याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास केला. रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठीची प्रक्रिया पार पाडली. पावसाळ्यातील चार महिन्यात नाल्यांमधून वाहून वाया जाणाऱ्या लाखो लिटर शुद्ध पाण्याची साठवणूक केली. सोसायटीच्या नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिसादाला केवळ यावर्षी अनुभवलेली पाणी टंचाई हे एकमेव कारण असल्याचे प्रा. अश्विनी मिरजकर, समीर जाधव, उमेश कौशिक, के. डब्ल्यू. शेलारे, संजय वानखेडे, विशाल साखरे यांनी सांगितले.