उपराजधानीतील रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्ती कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 10:42 AM2019-08-09T10:42:58+5:302019-08-09T10:45:44+5:30
नवीन इमारतीचे बांधकाम करताना रेनवॉटर हार्वेस्टिंगची सक्ती केली आहे. मात्र घेण्यात आलेले निर्णय कागदावर आहेत. एकदा बांधकाम परवानगी मिळाली की बांधकाम व्यावसायिक वा सर्वसामान्य नागरिक महापालिकेकडे वळूनही बघत नाही.
गणेश हूड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. खाली जागेवर टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. शहरात सर्वत्र सिमेंट रस्त्यांचे जाळे निर्माण होत आहे. जमिनीत पाणी मुरण्यासाठी जागाच शिल्लक ठेवली नाही. नवीन इमारतीचे बांधकाम करताना रेनवॉटर हार्वेस्टिंगची सक्ती केली आहे. ही यंत्रणा उभारण्यासाठी महापालिके ने ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच मालमत्ता करात सवलत देण्याची घोषणा केली होती. मात्र घेण्यात आलेले निर्णय कागदावर आहेत. एकदा बांधकाम परवानगी मिळाली की बांधकाम व्यावसायिक वा सर्वसामान्य नागरिक महापालिकेकडे वळूनही बघत नाही.
मागील पाच वर्षात शहरात १३२२ इमारत बांधकामांना मंजुरी देण्यात आली. यातील ६५० जणांनी रेनवॉटर हार्वेंस्टिंग केल्याची माहिती नगररचना विभागाने दिली. परंतु किती जणांनी जलपुनर्भरण कार्यक्रमांतर्गत इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिग यंत्रणा उभारली याबाबत संभ्रम असून मंजुरीच्या तुलनेत कितीतरी पटींनी अधिक बांधकाम झाले आहे.
प्रकल्पात पुरेसा जलसाठा नसल्याने प्रथमच शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. या प्रकल्पातील जलसाठ्यात अजूनही वाढ झालेली नाही. प्रकल्पात पुरेसा जलसाठा न झाल्यास उन्हाळ्यात शहरात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. असे असतानाही नागरिकात रेन वॉटर संकल्पना राबविण्याबाबत कमालीची उदासीनता दिसून येते. नासुप्रने बांधकामाची मंजुरी देताना रेनवॉटर हार्वेस्टिंग शुल्क वसूल केले होते. या निधीतून रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी अनुदान द्यावे, असा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला होता. परंतु याची अंमलबजावणी झाली नाही.
यंत्रणा न उभारल्यास परवानगी रद्द करू
रेन वॉटर हार्वेस्टिंग काळाची गरज आहे. मागील काही वर्षापासून याची सक्ती के ली जात आहे. जनजागृतीही केली जात आहे. ज्या नागरिकांनी रेन हॉर्वेस्ंिटंग केले आहे त्याचे चांगले परिणाम दिसत आहे. बांधकाम करताना सर्वांनीच रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याची गरज आहे. या आवाहनाला प्रतिसाद न दिल्यास संबंधितांना देण्यात आलेली बांधकाम परवानगी रद्द करण्यात येईल.
- रवींद्र ठाकरे,
अपर आयुक्त
सक्तीमुळे जनजागृतीला मदत
बांधकाम करताना रेन वॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्यात आले आहे. त्याशिवाय बांधकामाची परवानगी दिली जात नाही. गेल्या पाच वर्षात नागपूर शहरात ६५० जणांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केले आहे. सक्तीमुळे जनजागृतीला मदत होत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरज आहे. नवीन बांधकाम करताना रेन वॉटर हॉर्वेस्टिंग न केल्यास संबंधितांची बांधकाम परवानगी रद्द केली जाते.
- प्रमोद गावंडे, सहायक संचालक नगररचना विभाग
असे केले जाते जलपुनर्भरण
पावसाच्या पाण्याची साठवण ( रेन वॉटर हार्वेस्ंिटंग ) म्हणजे पुनर्वापरासाठी पाणी जमा करणे. पावसाचे पाणी घराच्या छतावरून जमिनीखालच्या एका मोठ्या टाकीत गोळा करतात तर काही ठिकाणी साठवावयाचे पाणी खोल खड्डा करून जमिनीत सोडण्यात येते.ज्या ठिकाणी पाणी मुरते तेथे जवळपास विंधन विहिर असल्यास उन्हाळ्यातही पाणी कमी होत नाही.आपण साठवलेले पाणी निसर्ग आपल्याला परत देतो. जमिनीची पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत आहे, हे विशेष.
जल पुनर्भरणाचे हे आहेत फायदे
पाणीपुरवठ्यासाठी बाहेरील स्रोतावर कमी प्रमाणात अवलंबून राहावे लागते. जलसंधारणामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते.
भूगर्भातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे पाणी वर खेचण्यासाठी लागणाऱ्या विजेच्या वापरात बचत होते. जमिनीखालील पाण्याच्या प्रदूषणाचे सौम्यीकरण झाल्यामुळे, पाण्याचा दर्जादेखील सुधारतो. जमिनीची धूप रोखण्याला काही प्रमाणात मदत होते.
गच्चीवरील पाण्याच्या संधारणाच्या पद्धती तुलनेने अवलंबण्यास सोप्या आहेत. रेन वॉटर हार्वेस्ंिटगवर केला जाणारा खर्च हा खर्च नसून ती भविष्यासाठी गुंतवणूक आहे. स्वत: साठी हे करावे.
निसर्गात स्वच्छ आणि गोड्या पाण्याची कमतरता असल्यामुळे अधिक गोड्या पाण्याचा पुरवठा करणाºया पावसाच्या पाण्याचे नियोजन आवश्यक आहे.
आज पर्यावरणाची परिस्थिती पाहता भूगर्भातील पाणी संपायला फारसा वेळ लागणार नाही. तेव्हा पावसाचे पाणी हे निसर्गाने दिलेले दान समजून त्याचा जास्तीत जास्त वापर करणे
गरजेचे आहे.