पावसाची दडी; विदर्भात ६२ टक्के कमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2022 09:07 PM2022-06-18T21:07:56+5:302022-06-18T21:09:20+5:30
Nagpur News पावसाने दडी मारल्याचे चित्र असून आगमनाच्या तिसऱ्या दिवशीही चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
नागपूर : मार्चपासून उन्हाच्या झळा सहन करणाऱ्या विदर्भवासीयांसाठी मान्सूनची सुरुवात निराश करणारी आहे. पावसाने दडी मारल्याचे चित्र असून आगमनाच्या तिसऱ्या दिवशीही चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. विदर्भात आतापर्यंत ६२ टक्के कमी पावसाची नाेंद झाली आहे. या काळात सर्वत्र ७९.२ मिमी पाऊस नाेंदविला जाताे. मात्र १८ जूनपर्यंत केवळ ३०.५ मिमी पाऊसच नाेंदविला गेला. म्हणूनच शेतकऱ्यांसाेबत उन्हाने हाेरपळणाऱ्या लाेकांनाही जाेरदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
हवामान विभागानुसार गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनची रेषा आहे तिथेच थांबली आहे. सध्या गुजरातचे पाेरबंदर, भावनगर, मध्य प्रदेशचे खंडवा, विदर्भाचे गाेंदिया व छत्तीसगडच्या दुर्ग परिसरातून हाेत पूर्वाेत्तर राज्यांपर्यंत पावसाळी ढग दाटले आहेत. दरम्यान महाराष्ट्रात सर्वत्र पावसाळा पाेहचल्याची अधिकृत घाेषणा करण्यात आली आहे. मात्र जाेरदार पणे पावसाच्या सरी बरसण्याची प्रतीक्षा कायम आहे.
नागपुरात ६१ टक्के कमी पाऊस
नागपुरात आतापर्यंत सरासरी ६१ टक्के कमी पाऊस झाला आहे. जून महिन्यात सरासरी १६९ मिमी पाऊस नागपुरात हाेताे पण यावेळी आतापर्यंत केवळ १३.७ मिमी पाऊस नाेंदविला गेला आहे. असलेली परिस्थिती पाहता येत्या तीन-चार दिवसातही मुसळधार पाऊस हाेण्याची शक्यता दिसून येत नाही. शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण हाेते पण दुपारी सूर्य तापला हाेता. सायंकाळ हाेता हाेता काळे ढग दाटले आणि आर्द्रतेचा स्तर ९० टक्क्यांपर्यंत पाेहचला. मात्र अपेक्षेप्रमाणे पाऊस झालाच नाही. काही ठिकाणी सरी बरसल्या आणि २ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. तापमान ३५.८ अंश नाेंदविण्यात आले.
भंडाऱ्यात स्थिती गंभीर
विदर्भात सर्वच जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस नाेंदविला गेला आहे. भंडाऱ्यात सर्वात कमी सरासरीपेक्षा ८० टक्के कमी पाऊस झाला. अकाेल्यात याआधी झालेल्या थाेड्या पावसाने स्थिती बरी आहे पण सरासरीपेक्षा ३३ टक्के कमीच आहे. दुसरीकडे गाेंदिया ७७ टक्के, चंद्रपूर ६२ टक्के, गडचिराेली ७३ टक्के, यवतमाळ ६२ टक्के, अमरावती ६४ टक्के, वाशिम ४५ टक्के तर वर्ध्यात ५४ टक्के कमी पावसाची नाेंद झाली आहे.