नागपुरात हिवसाळा कायमच : पावसामुळे गारठा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 12:24 AM2020-02-04T00:24:16+5:302020-02-04T00:25:12+5:30
फेब्रुवारी महिना उजाडल्यावरदेखील उपराजधानीतून पावसाने पूर्णत: ‘एक्झिट’ घेतलेली नाही. शहरात सोमवारीदेखील पावसाने हजेरी लावली. शिवाय गारठादेखील वाढल्याने परत शहरवासीयांनी ‘हिवसाळा’ अनुभवला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फेब्रुवारी महिना उजाडल्यावरदेखील उपराजधानीतून पावसाने पूर्णत: ‘एक्झिट’ घेतलेली नाही. शहरात सोमवारीदेखील पावसाने हजेरी लावली. सकाळच्या वेळी आलेल्या पावसामुळे शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच चाकरमान्यांची तारांबळ उडाली. शिवाय गारठादेखील वाढल्याने परत शहरवासीयांनी ‘हिवसाळा’ अनुभवला. मंगळवारीदेखील पाऊस येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
शहरात सकाळपासूनच ढगाळलेले वातावरण होते. सकाळी ९.३०नंतर अचानकच शहरातील विविध भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली. कुठे तुरळक तर काही ठिकाणी अल्पकाळासाठी जोरात पाऊस आला. त्यानंतर हवेतील गारठा आणखी वाढला. त्यानंतर दुपारी २ वाजताच्या सुमारास परत पाऊस झाला. विविध बाजारांमध्ये असलेल्या लोकांची यावेळी तारांबळ उडाली. दिवसभरात शहरात ०.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार मंगळवारीदेखील नागपूरसह विदर्भात पाऊस येण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस येऊ शकतो. ७ फेब्रुवारीपर्यंत अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे. ८ ते ९ फेब्रुवारीकडे वातावरण नीरभ्र होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शहरात बोचरी थंडी
सोमवारी नागपुरात किमान १५.२ अंश सेल्सिअस किमान तर कमाल २४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. परंतु दिवसभर बोचरे वारे वाहत होते व त्यामुळे हुडहुडी भरली होती.