दाेन दिवसात पावसाचा बॅकलाॅग ४४ टक्क्यांनी दूर; नागपुरात आतापर्यंत १०२.१ मिमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2022 10:07 PM2022-06-21T22:07:49+5:302022-06-21T22:08:16+5:30
Nagpur News गेल्या दीड-दाेन दिवसात झालेल्या दमदार पावसाने जून महिन्यातील मान्सूनचा बॅगलाॅग ६१ टक्क्यांवरून १७ टक्क्यांवर आला आहे.
राजीव सिंह
नागपूर : पुढचे दाेन दिवस पावसाळी ढगांची मेहरबानी नागपूरवर राहू शकते. त्यानंतर मात्र पाऊस दडी मारू शकताे. कमी दाबाचे क्षेत्र तयार न झाल्याने पावसाळी ढग दूर जाऊ शकतात. दरम्यान, गेल्या दीड-दाेन दिवसात झालेल्या दमदार पावसाने जून महिन्यातील मान्सूनचा बॅगलाॅग ६१ टक्क्यांवरून १७ टक्क्यांवर आला आहे. दीड दिवसात ४४ टक्के पावसाची रिकव्हरी झाली आहे. सरासरीपेक्षा २० टक्के कमी किंवा जास्त पाऊस झाला तर ताे सामान्य मानला जाताे. नागपूरसह विदर्भात गाेंदियामध्ये १५ टक्के तुटीसह सामान्य पाऊस झाला आहे.
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहरात २१ जून राेजी सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत १०२.१ मिमी पाऊस नाेंदविला गेला. जून महिन्यात सरासरी १६९ मिमी पाऊस हाेताे. तज्ज्ञांच्या मते आकाशात व्यापलेल्या ढगांमध्ये पावसाला अनुकूल आर्द्रता नाही. नागपुरात मंगळवारी सकाळी ८.३० वाजतापर्यंत ६०.४ मिमी पाऊस झाला आणि सकाळपासून सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत १९ मिमी पाऊस नाेंदविला गेला. दीड दिवसात ७९.४ मिमी पाऊस झाल्याने नागपुरात पावसाचा बॅगलाॅग काही प्रमाणात दूर झाला आहे.
पाऊस व ढगांनी तापमान घसरले
नागपूरला मंगळवारी दुपारी शहरात काही भागात दमदार पाऊस झाला, मात्र काही भागात काेरड पडली. आकाश दिवसा काळ्या ढगांनी आच्छादले हाेते. ढगाळ वातावरणामुळे दिवस व रात्रीच्या तापमानात घट झाली. दिवसाचे कमाल तापमान ३२.४ अंश तर रात्रीचे तापमान २२.१ अंश नाेंदविण्यात आले. सकाळी आर्द्रता ९६ टक्के हाेती, जी सायंकाळी ९३ टक्के नाेंदविण्यात आली.
असा वाढला पावसाचा ग्राफ
नागपूर शहरात १८ जूनपर्यंत केवळ १३.७ मिमी पाऊस झाला हाेता. १९ जूनला वाढून २२.७ मिमी झाला. २० जूनला दिवसभर ढग शांत हाेते. मात्र रात्री जाेरदार सरी बरसल्या आणि बॅकलाॅग ६१ टक्क्यांवरून १७ टक्क्यांवर घसरला. आतापर्यंत शहरात १०२.१ मिमी पाऊस नाेंदविला गेला.
पावसावर लागेल ब्रेक
हवामान विभागाचे उपमहासंचालक एम. एल. साहू यांनी सांगितले, येत्या दाेन दिवसात थांबून थांबून पाऊस हाेण्याची शक्यता आहे. त्यानंतर कमी दाबाचे क्षेत्र तयार हाेताना दिसत नसल्याने पावसावर ब्रेक लागू शकताे. राहिलेला बॅकलाॅग कधी दूर हाेईल, हे निश्चित सांगता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.