नागपुरात गरजत बरसत आला पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 11:36 PM2019-07-19T23:36:45+5:302019-07-19T23:39:12+5:30

‘तो कधी येणार, तो कधी कृपा करणार’ या प्रतीक्षेत असलेल्या नागपूरकरांना शुक्रवारी सायंकाळी चांगलाच दिलासा मिळाला. सायंकाळी ७ च्या सुमारास आलेल्या पावसाने अर्ध्या तासातच जोरदार बरसात केली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले. सीताबर्डी, रामदासपेठ, धंतोलीसह पश्चिम नागपुरातील तर अनेक चौक जलमय झाले होते.

Rainfall with lightening and thundering in Nagpur | नागपुरात गरजत बरसत आला पाऊस

नागपुरात गरजत बरसत आला पाऊस

Next
ठळक मुद्देअर्धा तास दमदार बरसात, उपराजधानी पाणीपाणी : अनेक भागात साचले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘तो कधी येणार, तो कधी कृपा करणार’ या प्रतीक्षेत असलेल्या नागपूरकरांना शुक्रवारी सायंकाळी चांगलाच दिलासा मिळाला. सायंकाळी ७ च्या सुमारास आलेल्या पावसाने अर्ध्या तासातच जोरदार बरसात केली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले. सीताबर्डी, रामदासपेठ, धंतोलीसह पश्चिम नागपुरातील तर अनेक चौक जलमय झाले होते.


नागपूर जिल्ह्यात सायंकाळी ५.३० पर्यंत सरासरी १८.३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मौदा तालुक्यात सर्वाधिक ८७.६० मिमी पावसाची नोंद झाली. सकाळी ढग दाटून आले होते, परंतु पाऊस पडला नाही. दुपारी शहरात ऊन पडले होते व उकाडा जाणवत होता. सायंकाळी ६.३० नंतर मात्र जोरदार वाऱ्यांसह पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर इतका जास्त होता की सीताबर्डी, धंतोली, सेंट्रल बाजार रोड, शंकरनगर चौक, धरमपेठ, गोकुळपेठसह सायंकाळी ७.३० वाजता गुडघाभर पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीचीदेखील कोंडी झाली होती. पाण्याचा निचरा होण्यासदेखील बराच वेळ लागला. 

मनपाची पोलखोल
केवळ अर्धा तासाच्या पावसाने मनपाने नदी व नाल्यांच्या स्वच्छतेबाबत केलेल्या दाव्यांची पोलखोल केली. फूटपाथवरील नाल्या चोक झाल्याचे दिसून आले. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. शहरात काही ठिकाणी झाडेदेखील पडल्याच्या तक्रारी अग्निशमन विभागाकडे आल्या.
पंचशील चौकात दुकानांपर्यंत पाणी
पंचशील चौकात गुडघ्यापर्यंत पाणी भरले होते. दुकानांमध्ये पाणी शिरण्याची स्थिती निर्माण झाली होती. पाऊस लवकर थांबल्याने दुकानदारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. अलंकार टॉकीज ते शंकरनगर चौकादरम्यान पाण्याचा निचरा न झाल्याने पाणी साचले होते.
अर्धा डझन झाडे पडली
शहरात अर्ध्या डझनाहून अधिक झाडे पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात पंचशील चौक स्थित जसलीन हॉस्पिटलजवळ, त्रिमूर्ती नगरातील नागोबा मंदिराजवळ, खामला येथील शिवमंदिराजवळ, जय बद्रीनाथ सोसायटी, धंतोलीतील रामकृष्ण मठाजवळ झाड पडले.
चार दिवस पावसाचे
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार नागपूरसह विदर्भातील अनेक भागात २० ते २३ जुलैदरम्यान जोरदार पाऊस येऊ शकतो. या कालावधीत चांगला पाऊस येण्याची शक्यता आहे. पावसासाठी वातावरणाची स्थिती अनुकूल आहे.
पावसामुळे वीज पूरवठा खंडित
अर्धा तास झालेल्या मुसळधार पावसाने अनेक भागातील वीजपुरवठा प्रभावित झाला. हिंगणा येथून येणाऱ्या १३२ केव्ही लाईन ट्रीप झाल्याने शंकरनगर, गांधीनगर, डागा ले-आऊटसह पश्चिम नागपुरातील अनेक भागातील वीज ग्राहकांना फटका बसला. दुसरीकडे रामकृष्ण मठाजवळ विजेचा खांब तुटल्याने सहा ट्रान्सफार्मर ठप्प झाले. त्यामुळे शेकडो ग्राहकांची वीज खंडित झाली. धंतोली तकिया आणि रामदासपेठमध्ये विजेच्या लाईनवर झाडाची फांदी तुटल्याने सुरेंद्रनगर कंडक्टर फुटले. त्यामुळे प्रतापनगर, अत्रे-ले-आऊट, गणेश कॉलनीतील वीजपुरवठाही प्रभावित झाला. शिवाय स्वावलंबीनगरातही वीज गूल होती. या ठिकाणी अनेक नागरिक सबस्टेशनवर पोहोचले होते. वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलच्या बहुतांश फिडरवरील वीजपुरवठा सुरळीत होता. मेयो फिडरवर समस्या निर्माण झाली. हिंगणा सब स्टेशनमधून होणारा वीजपुरवठा प्रभावित झाल्याने त्याच्याशी जुळलेले फीडर बंद होते. तर पावसामुळे नारा फिडर बंद करावे लागले.

Web Title: Rainfall with lightening and thundering in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.