नागपुरात पावसाचा ‘बॅकलॉग’ झाला दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:57 AM2019-08-01T00:57:41+5:302019-08-01T00:58:23+5:30
मागील आठवड्यापर्यंत पावसाने पाठ फिरविल्यामुळे चिंतातूर झालेल्या नागपूरकरांना आता दिलासा मिळाला आहे. सहा दिवसात शहरात २६२.२ मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरीजवळ आकडेवारी आली आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार ३१ जुलैपर्यंत नागपूर जिल्ह्यात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडलेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील आठवड्यापर्यंत पावसाने पाठ फिरविल्यामुळे चिंतातूर झालेल्या नागपूरकरांना आता दिलासा मिळाला आहे. सहा दिवसात शहरात २६२.२ मिमी पावसाची नोंद झाली असून सरासरीजवळ आकडेवारी आली आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार ३१ जुलैपर्यंत नागपूर जिल्ह्यात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडलेला आहे.
१ जून ते ३१ जुलै या कालावधीत नागपूर जिल्ह्यात सरासरी ५१९.९८ मिमी पाऊस पडतो. यंदा १ जून ते ३१ जुलै या काळात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस झाला आहे. तर विदर्भात सरासरीच्या ९० टक्के पाऊस पडला आहे. मागील सहा दिवसात पावसाचे प्रमाण वाढले असले तरी शहराला पाणीपुरवठा करणारा तोतलाडोह तलाव, नवेगाव खैरी येथील जलस्तर वाढलेला नाही. यामुळे शहरात पाणीकपात अद्यापही सुरू आहे.
मंगळवारी दिवसभर शहरात पाऊस होता तर बुधवारी पावसाची तीव्रता कमी होती. नागपुरात सकाळी ८.३० पर्यंत ८७.१ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील दोन दिवस पाऊस कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. बुधवारी आर्द्रता १०० ते ९६ टक्के इतकी होती तर कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
उमरेड, भिवापूरमध्ये अतिवृष्टी
नागपूर विभागात गेल्या २४ तासात सरासरी ५५.५८ मिमी पावसाची नोंद झाली असून भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात सर्वाधिक १७५ मिमी पावसाची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात १३९.१० मिमी तर उमरेड तालुक्यात १३५.३० मिमी पावसाची नोंद झाली. कुही (९७.४ मिमी), मौदा (८५ मिमी)व हिंगणा (६७.८ मिमी), कामठी (५९.४ मिमी) पावसाची नोंद झाली.