नागपुरात पुढील तीन दिवस पावसाचे : २४ तासात १० मिमी पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 12:26 AM2020-07-14T00:26:42+5:302020-07-14T00:28:01+5:30
मागील आठवड्यात निराशा केल्यानंतर रविवारपासून उपराजधानीत पावसाने परत हजेरी लावली आहे. रविवारी रात्रीनंतर सोमवारी सायंकाळीदेखील जोरदार पाऊस आला. पुढील तीन दिवस विदर्भासह नागपूर जिल्ह्यातदेखील मध्यम स्वरूपाच्या धारा बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील आठवड्यात निराशा केल्यानंतर रविवारपासून उपराजधानीत पावसाने परत हजेरी लावली आहे. रविवारी रात्रीनंतर सोमवारी सायंकाळीदेखील जोरदार पाऊस आला. पुढील तीन दिवस विदर्भासह नागपूर जिल्ह्यातदेखील मध्यम स्वरूपाच्या धारा बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
जून महिन्यात सरासरीहून अधिक प्रमाणात कोसळल्यानंतर पावसाने विश्रांतीच घेतली होती. त्यामुळे १३ जुलैपर्यंत या मोसमातील पावसाची एकूण टक्केवारी १ टक्क्याने घटली. रविवारी रात्री काही वेळ जोरदार पाऊस आला. सोमवारी सकाळपासून ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. सायंकाळी ६ नंतर काळे ढग दाटून आले व त्यानंतर काही वेळ जोरदार पाऊस झाला. मागील २४ तासात शहरात १० मिमी पावसाची नोंद झाली.
दरम्यान, हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार १६ जुलैपर्यंत नागपूर जिल्ह्यात चांगला पाऊस येण्याची शक्यता आहे. शहरात मध्यम स्वरूपाचा म्हणजेच साधारणत: ५० मिमी पाऊस दिवसभरात कोसळू शकतो. विदर्भात काही ठिकाणी गुरुवारी मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.