पावसाचा जाेर झाला कमजाेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:13 AM2021-08-21T04:13:13+5:302021-08-21T04:13:13+5:30
नागपूर : हवामान विभागाच्या अंदाजाला हुलकावणी देत पुन्हा पावसाने दडी मारल्याचे चित्र शुक्रवारी हाेते. दाेन-तीन जिल्हे पावसाच्या हजेरीने ओले ...
नागपूर : हवामान विभागाच्या अंदाजाला हुलकावणी देत पुन्हा पावसाने दडी मारल्याचे चित्र शुक्रवारी हाेते. दाेन-तीन जिल्हे पावसाच्या हजेरीने ओले झाले पण विदर्भातील इतर जिल्ह्यात उपस्थिती नगण्य हाेती. दिवसभर ढगांची गर्दी असली तरी नागपूरला थेंबही पडला नाही. सकाळपर्यंत अगदी नगण्य अशी ०.१ मिमी पावसाची शहरात नाेंद झाली. गाेंदियात सर्वाधिक २२ मिमी पाऊस पडला.
तशी दमदार हजेरी लागण्याची परिस्थिती असतानाही नागपुरात गुरुवारपासूनच पावसाने हुलकावणी दिली. गुरुवारी सकाळपर्यंत ५३ मिमी पावसाची नाेंद झाली पण नंतर त्याने ताेंड फिरविले. जिल्ह्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाली पण शहर काेरडे हाेते. ढगाळ वातावरण असल्याने तापमान सामान्य हाेते. दरम्यान विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात हीच स्थिती हाेती. सरासरी ५० मिमीच्या आसपास बरसणाऱ्या जलधारा अचानक बंद झाल्या. पावसाळी वातावरण असतानाही सरी मात्र आल्या नाहीत. त्यामुळे आज सकाळपर्यंत चंद्रपूर २ मिमी, गडचिराेली ३ मिमी, वर्धा ६.२ मिमी, अकाेला १.९ मिमी, बुलढाणा ५ मिमी, वाशिम शुन्य तर यवतमाळला ८ मिमी पावसाची नाेंद झाली. अमरावतीला ११ मिमी पाऊस नाेंदविला. गाेंदियाला बुधवारी उसंत घेतलेल्या पावसाने गुरुवारी मात्र चांगली हजेरी लावली.
दरम्यान हवामान विभागाने पुढचे दाेन-तीन दिवस विदर्भात ठिकठिकाणी कमीअधिक प्रमाणात चांगला पाऊस हाेण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. नागपूरसह काही जिल्ह्यात दमदार पाऊस हाेईल, अशी शक्यता आहे. पश्चिम विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा, तर पूर्व विदर्भात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. विशेष म्हणजे २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्यान सरासरीपेक्षा अधिक पाऊस हाेण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गेले काही दिवस झालेल्या पावसाने व ढगाळ हवामानामुळे बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान पुन्हा ३० अंशांच्या खाली आले आहे.