पावसाची कूच पूर्व विदर्भाकडे, नागपूरवरही ढग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 10:57 PM2021-06-16T22:57:22+5:302021-06-16T22:57:47+5:30
Rains march towards East Vidarbha हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वी संपूर्ण विदर्भात दिलेला पावसाचा इशारा आता बदलला आहे. वाऱ्याच्या गतीमुळे आता पूर्व विदर्भाकडे पावसाच्या ढगांनी कूच केली असून नागपूरवरही हे वातावरण कायम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वी संपूर्ण विदर्भात दिलेला पावसाचा इशारा आता बदलला आहे. वाऱ्याच्या गतीमुळे आता पूर्व विदर्भाकडे पावसाच्या ढगांनी कूच केली असून नागपूरवरही हे वातावरण कायम आहे.
नागपुरात मंगळवारी दुपारी अर्धा तास पाऊस पडला असला तरी १३.३ मिमी अशी नोंद झाली आहे. बुधवारी दुपारी पावसाचे वातावरण निर्माण झाले असले तरी वाऱ्यासोबत ढग विरळ झाले. त्यामुळे दिवसभरात पाऊस आला नाही. शहरात सकाळी आर्द्रता ८५ टक्के नोंदविली गेली. तर सायंकाळी ती बरीच घसरून ६९ टक्क्यांवर आली होती. तापमान ०.७ अंश सेल्सिअसने किंचित खालावून ३५ अंशावर पारा होता.
विदर्भात सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा खालावला. बहुतेक ठिकाणी पारा ३५ अंशावरच होता. नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम या ठिकाणी मागील २४ तासात पावसाची नोंद झाली आहे. वाशिममध्ये सर्वाधिक ७० तर गडचिरोलीमध्ये ३१ मिमी पाऊस पडला.
दरम्यान, हवामान विभागाने नव्याने जारी केलेल्या सूचनेनुसार, पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यात या आठवड्यात वादळ आणि मेघगर्जनेसह दमदार पावसाची शक्यता वर्तविली आहे.
विदर्भातील तापमान
जिल्हा : कमाल : किमान
अकोला : ३५.७ : २२.४
अमरावती : ३४.४ : २२.३
बुलडाणा : ३५.० : २४.०
चंद्रपूर : ३२.८ : २१.०
गडचिरोली : ३१.० : २३.०
गोंदिया : ३३.५ : २३.८
नागपूर : ३५.० : २४.१
वर्धा : ३५.८ : २४.५
वाशिम : अप्राप्त : २०.२
यवतमाळ : ३४.० : अप्राप्त