रेल्वेस्थानकातील लेडीज वेटिंग हॉलमध्ये शिरले पावसाचे पाणी; कार्यालयही जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2022 02:03 PM2022-07-02T14:03:24+5:302022-07-02T14:10:58+5:30
या पावसामुळे रेल्वेच्या इंजिनिअरिंग विभागाने मान्सूनपूर्व केलेल्या तयारीची पोलखोल झाली.
नागपूर : शुक्रवारी झालेल्या पावसामुळे नागपूररेल्वे स्थानकावरील लेडीज वेटिंग हॉलमध्ये पाणी भरले, तर उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयही जलमय झाले. रिझर्व्हेशन तिकीट काऊंटर परिसराच्या छतावरून पाणी गळत होते. त्यामुळे रेल्वे प्रवासी व कर्मचारी त्रस्त झाले होते. या पावसामुळे रेल्वेच्या इंजिनिअरिंग विभागाने मान्सूनपूर्व केलेल्या तयारीची पोलखोल झाली.
दरवर्षी रेल्वे स्टेशनवर रेल्वेच्या इंजिनिअरिंग विभागाकडून मान्सूनपूर्व तयारी करण्यात येते. पण ही तयारी कामचलावू असल्याने दरवर्षी स्टेशनवर पावसाळ्यात पाणी जमा होते. यंदाही पावसाच्या पाण्याने स्टेशन डायरेक्टर चेंबरमधील व्हीआयपी गेस्ट लाऊंजसोबतच वेटिंग रूम, उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालय जलमय झाले होते. मध्य रेल्वे नागपूर मंडळ प्रशासनाने स्टेशनवर पावसाचे पाणी जमा होणार नाही, यासाठी स्टेशनच्या पश्चिम गेट परिसरातून पूर्व गेट परिसरापर्यंत अंडरग्राऊंड मोठ्या आकाराची पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताव तयार केला होता. यावर कामदेखील सुरू झाले. डिझाईन व नकाशे बनविण्यात आले. परंतु पुढे काम थंडबस्त्यात राहिले. त्यामुळे पावसाचे पाणी स्टेशनमध्ये शिरते. त्याचा कर्मचारी व प्रवाशांना त्रास होतो. मात्र याकडे इंजिनिअरिंग विभागाचे दुर्लक्ष आहे.
- विस्तृत रिपोर्टची प्रतीक्षा
प्लास्टिक बॉटल, सॅनिटरी नॅपकिन, खाद्यपदार्थांचे रॅपर टाकल्यामुळे रेल्वे स्थानकावरील गटर तुंबते. पाणी का साचते, यासंदर्भात विस्तृत रिपोर्टची प्रतीक्षा आहे.
- विजय थूल, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर मंडळ