रेल्वे रुग्णालयात शिरले पावसाचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:07 AM2021-07-09T04:07:37+5:302021-07-09T04:07:37+5:30
नागपूर : बऱ्याच दिवसानी नागपुरात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. मात्र या पावसाने रेल्वे रुग्णालयातील रुग्णांवर आणि डॉक्टरांवर धावाधाव करण्याची ...
नागपूर : बऱ्याच दिवसानी नागपुरात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. मात्र या पावसाने रेल्वे रुग्णालयातील रुग्णांवर आणि डॉक्टरांवर धावाधाव करण्याची वेळ आणली.
सकाळी सुरू झालेला पाऊस सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होता. शहरातील अनेक भागात पाणी साचल्याने जलमय स्थिती झाली. मध्य रेल्वे नागपूर मंडळाचे रेल्वे रुग्णालयही यातून सुटले नाही. नागपूर स्टेशनच्या जवळच असलेल्या या रुग्णालयाचे वॉर्ड जलमय झाले. पावसाचे पाणी जमा झाल्याने रुग्ण, डॉक्टर आणि स्टाफला बरीच धावाधाव करावी लागली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वॉर्ड क्रमांक एक आणि दोन सोबतच कोविड रुग्णांच्या वॉर्डातही पाणी शिरून एक फुटापर्यंत जमा झाले. डॉक्टरांच्या कक्षाबाहेरही पाणी साचले. यामुळे वैद्यकीय सेवा प्रभावित झाली. रुग्णालयात सध्या ८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या सोबतच, लहान मुलांचे लसीकरणही सुरू आहे. इंजिनियरिंग विभागाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी अद्यापही पाॅवर ड्रेन वाॅटर सिस्टीम लावण्यात आलेली नाही. यामुळे मुसळधार पाऊस झाला की प्रत्येक वेळीच येथे ही परिस्थिती निर्माण होते. जवळच असलेल्या नाल्याचे पाणी रुग्णालयात शिरले नाही, हे नशिबच समजायचे.
पंप लावून काढले पाणी
रेल्वे रुग्णालयामध्ये शिरलेले पावसाचे पाणी काढण्यासाठी मोटार पंप लावावे लागले. यासाठी वेळेवर धावपळ करून ही व्यवस्था करावी लागली. त्याशिवाय उपचार करणे शक्य नव्हते. पावसाचे पाणी शिरल्याने दुर्गंधी पसरली, त्यामुळे स्वच्छतेचाही ताण वाढला. या संदर्भात मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी एस. जी. राव यांची प्रतिक्रिया घेतली असता, पावसाचे पाणी शिरण्याच्या कारणांचा शोध घेऊन आवश्यक ती दुरुस्ती करून घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले.
...