अवकाळी पावसाने विदर्भातील सोयाबीन व कापसाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 11:19 AM2019-10-28T11:19:42+5:302019-10-28T11:20:04+5:30
गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे कापणीला आलेले सोयाबीन तर काही प्रमाणात कापसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे कापणीला आलेले सोयाबीन तर काही प्रमाणात कापसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे.
गोंदिया जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी कोसळलेल्या पावसाने दीड लाख हेक्टरमधील पिकांना फटका बसला. यात धानासह तुरीचेही नुकसान झाले. जिल्ह्यात सध्या खरिपातील हलक्या धानाची कापणी सुरू आहे. अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात कापणी केलेल्या धानच्या कडपा ओल्या झाल्या. परिणामी धानपाखड होऊन चांगल्या दर मिळण्यापासून शेतकऱ्यांना वंचित रहावे लागणार आहे.
तसेच शेतात उभे असलेले सोयाबीन व कापसाला यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात मोठा फटका बसला. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन कापून नेले होते. मागील गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने ते सडून गेले असून काहींना कोंबही फुटू लागले आहेत.
वर्धा जिल्ह्यात या पावसाने कापसाला मोठा फायदा मिळेल अशी चिन्हे आहेत. सोयाबीन निघाल्याने अनेक शेतकरी गहू व चण्यासाठी शेते तयार करीत होते. त्यासाठी पाण्याची गरज होतीच. या पावसामुळे त्यांचे काम सुकर झाले आहे.