पावसाची दडी, दुबार पेरणीचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:08 AM2021-07-01T04:08:06+5:302021-07-01T04:08:06+5:30
बाजारगाव : गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. यावर्षी मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. ...
बाजारगाव : गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. यावर्षी मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. मृग नक्षत्रामध्ये बाजारगाव परिसरात पावसाने हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनची पेरणी केली. यंदा वेळेवर पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र गत गुरुवारी मुसळधार पावसाने कोंब आलेले बियाणे दबल्या गेले. अधिक माती बियाण्यांवर आल्याने आणि नंतर पावसाने दडी मारल्याने बी जमिनीतच सडले. अशातच शेतकऱ्यांनी उसनवारी करीत पुन्हा बियाणे आणण्यासाठी धाव घेतली. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला. गत १० दिवसापासून पावसाचा पत्ता नसल्याने दुबार पेरणी केलेले बियाणेसुद्धा निघेनासे झाले. त्यामुळे निसर्गाचा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी तुषार सिंचनाद्वारे पीक वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र कोरडवाहू शेतकऱ्यांना पर्याय नसल्याने आता पेरणी कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला.
नागपूर ग्रामीण तालुक्यातील शिवा, सावंगा, बाजारगाव, सातनवरी, धामना, व्याहाड, पेठ, डिगडोह, देवळी गौराळा या गावामध्ये ९० टक्के पेरणी झाली असून, ७० टक्के शेतकऱ्यांना दुपार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे शासनाने या क्षेत्राचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
- हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा समाधानकरक पाऊस होईल, असे वाटले. त्यानुसार मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने आम्ही पेरणी केली. गत गुरुवारी मुसळधार पाऊस झाल्याने कापूस आणि सोयाबीन बियाणे दबल्या गेले. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
- विलास उईके, शेतकरी, सावंगा