पावसाळा आला, नाल्या कधी होणार साफ ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:08 AM2021-07-17T04:08:19+5:302021-07-17T04:08:19+5:30
मोवाड: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसला. आता पावसाळा सुरू झाल्याने साथीच्या आजारांनी तोंड वर काढले आहे. ...
मोवाड: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसला. आता पावसाळा सुरू झाल्याने साथीच्या आजारांनी तोंड वर काढले आहे. मात्र मोवाड शहरात अद्यापही नगर परिषदेच्यावतीने नाल्या स्वच्छता मोहीम राबविण्यात आली नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. यासंदर्भात स्थानिक भाजपा व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्यावतीने मुख्याधिकारी पल्लवी राऊत यांना निवेदन देण्यात आले. तीत शहरातील नाली सफाई, गांजरगवत, पाईप लाईन लिकेज, पाण्याची टाकी सफाई आदी विषयाकडे लक्ष वेधण्यात आले. मोवाड शहरात केवळ मुख्य नाल्याची सफाई झाली आहे. इतर नाल्या साफ न झाल्याने शहरात डासांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मलेरिया व डेंग्यूची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आठवडी बाजारातील नाल्यात कचरा साचल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहते. यासोबतच शहरातील विविध भागात वाढलेले गांजर गवत हा नागरिकांसाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात इस्माईल बारुदवाले, दिनेश पांडे, रवींद्र माळोदे, नंदकिशोर कांबळे, चेतन ठोंबरे, श्रीकांत मालधुरे, शिवसेनेचे ललित खंडेलवाल आदींचा समावेश होता.