शेतकऱ्यांसाठी आवाज उठवायचाय!
By Admin | Published: September 27, 2015 02:28 AM2015-09-27T02:28:45+5:302015-09-27T02:28:45+5:30
शेतकरी हाच देशातील सर्वात मोठा घटक आहे. पण सध्याच्या काळात शेतकरी सर्वाधिक उपेक्षित आहे.
विठ्ठल वाघ : मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी मतांच्या ध्रुवीकरणाला प्रारंभ
नागपूर : शेतकरी हाच देशातील सर्वात मोठा घटक आहे. पण सध्याच्या काळात शेतकरी सर्वाधिक उपेक्षित आहे. शेतकऱ्यांचे संघटन प्रभावी नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी आपण फार व्यथित होतो. त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या जगण्याचीच मग कविता होते. संमेलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज उठविण्यासाठी प्रयत्न करणार, असे मत ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
विदर्भातील ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी यंदा संमेलनाध्यक्ष होण्यासाठी कंबर कसली आहे. तब्बल तीन दिवस विदर्भातील मतदारांशी त्यांनी संपर्क साधला. वैदर्भीयांसह विदर्भ साहित्य संघाचा पाठिंबा मला मिळतो आहे, असे ते म्हणाले. मुळात ज्येष्ठ साहित्यिकांना संमेलनाध्यक्ष होण्यासाठी एवढी पायपीट करावी लागणे दुर्दैवी आहे. संमेलनाध्यक्षपद सन्मानानेच देण्यात यावे, याबाबत अनेकदा आपण आग्रही मागणी केली; पण लोकशाही प्रक्रियेमुळे काही बाबींना इलाज नसतो. महामंडळाच्या घटनेतच त्यासाठी सुधारणा करण्याची गरज आहे. कारण लोकशाहीच्या नावाखाली होणारी ही निवडणूक म्हणावी तशी पारदर्शक होत नाही. वेगवेगळे दबाव गट आणि त्यांचे राजकारण या निवडणुकीतही चालतेच. निवडून आलो तर शेतकऱ्यांसाठी व मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी काम करणार, आहे. आतापर्यंत साहित्यिक म्हणून मिरविले नाही, कारण मी जे अनुभवले तेच मांडण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांचे दु:ख जवळून अनुभवले आहे. त्यामुळेच १० शेतकरी कुटुंबांना उभे करण्यासाठी काही मदत केली. साहित्य संमेलन शासनाच्या अनुदानावर होते, त्याला आपला विरोध आहे. मराठी भाषेच्या उत्सवात राजकारणाचा प्रभाव नसलाच पाहिजे; कारण साहित्य हे माणसाच्या जगण्याच्या संवेदना मांडणारे क्षेत्र आहे.(प्रतिनिधी)
विचारवंतांची हत्या हा सांस्कृतिक दहशतवादच
दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांची हत्या होणे समाजासाठी दुर्दैवी आहे. विचारांचा विरोध करण्यासाठी वैचारिक पात्रता असावी लागते. ज्यांची पात्रता नसते असेच लोक हत्येसारखे भ्याड कृत्य करतात. समाजात वेगवेगळ्या विचारांचे लोक असणे हीच समाजाची समृद्धता आहे. यात वैचारिक संघर्ष अटळ आहे. असा संघर्ष समाजाला समोर नेणारा असतो. पण वैचारिक संघर्षात मात मिळत असेल तर विचारवंतांची हत्या करणे म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद आहे. अशा लोकांपासून सावध राहायला हवे आणि त्याचा निषेधच केला पाहिजे, असे मत विठ्ठल वाघ यांनी व्यक्त केले.