राजभवनात समाजकंटकांनी टाकलेला ट्रकभर कचरा गोळा केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 11:47 PM2020-12-31T23:47:40+5:302020-12-31T23:49:39+5:30
Raj Bhavan,garbage collected, nagpur news शहरात राजभवन म्हणजे लाखभर झाडे असलेला, पशू, पक्षी अशा जैवविविधतेने संपन्न असलेला व्हीआयपी परिसर. मात्र आसपासच्या परिसरातील नागरिकांद्वारे घरातील कचरा टाकून या परिसराचे विद्रुपीकरण केले जाते. अशाचप्रकारे लाेकांकडून फेकलेला कचरा राजभवनचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी श्रमदान करून स्वच्छ केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात राजभवन म्हणजे लाखभर झाडे असलेला, पशू, पक्षी अशा जैवविविधतेने संपन्न असलेला व्हीआयपी परिसर. मात्र आसपासच्या परिसरातील नागरिकांद्वारे घरातील कचरा टाकून या परिसराचे विद्रुपीकरण केले जाते. अशाचप्रकारे लाेकांकडून फेकलेला कचरा राजभवनचे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी श्रमदान करून स्वच्छ केला. जवळपास ट्रकभर कचरा काढून राजभवन कचरामुक्त केले.
निसर्गाने इतका संपन्न परिसर असूनही असंवेदनशील लाेक त्यात घाण करण्याचे साेडत नाही. राजभवनच्या आसपास असलेल्या स्वीपर माेहल्ला, मुस्लिम लायब्ररी, तीननल चाैक, खाटीकपुरा, बिजलीनगर या भागातील लाेक त्यांच्या घरातील कचरा राजभवनच्या सुरक्षा भिंतीवरून आतमध्ये फेकतात. असा मनभर कचऱ्याचा ढीग राजभवनातील जंगलात पडला हाेता. मनपाच्या अधिकाऱ्यांना वेळाेवेळी तक्रारी केल्या पण त्यांनीही गांभीर्य दाखवले नाही. शेवटी रमेश येवले यांनीच पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांनी परिसरात फेकलेल्या दारूच्या बाॅटल्स, प्लास्टिक, टायर, पाइप, काचा, घरातील शिळे खाद्यपदार्थ वेचले. असा ट्रकभर कचरा कर्मचाऱ्यांनी जंगलातून काढला आणि राजभवनचे वैभव कायम केले.
जैवविविधतेचा व्हीआयपी परिसर
कधीकाळी राजभवन अतिक्रमणाने बुजला हाेता. दारू पिणारे, जुगार खेळणाऱ्या समाजकंटकांचा अड्डा झाला हाेता. अशावेळी येथे अधिकारी म्हणून आलेले रमेश येवले यांनी राजभवनचा कायापालट केला. हा परिसर केवळ अतिक्रमणमुक्त केला नाही तर या १०० एकराच्या परिसरात लाखाे वृक्षांची लागवड करून जैवविविधता समृद्ध केली. गेल्या २० वर्षात त्यांनी हा परिसर ९० टक्के अतिक्रमणमुक्त केला. परिसरात लहानमाेठे असे ४३ बंधारे बांधले, ८० एकरांमध्ये जैवविविधता उद्यान फुलविले. साेबतच फुलपाखरू उद्यान, मधमाशी उद्यान, गुलाब उद्यान तयार करून या परिसराचे रूपच पालटले. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रत्येक अतिविशिष्ट व्यक्तींना राजभवनची भुरळ पडल्याशिवाय राहत नाही.
राजभवन हा निसर्गरम्य खजाना आहे. आम्ही हा परिसर ऑक्सिजन झाेन म्हणून विकसित केला असून यातून दरराेज लाखाे लिटर ऑक्सिजन नागपूरकरांना मिळताे. मात्र काही दूषित मानसिकतेचे लाेक या परिसराला दूषित करीत आहेत. लाेकांनी शुद्ध हवेचा, निसर्गाचा, पक्ष्यांच्या किलबिलाटाचा आस्वाद घ्यावा. त्याचे साैंदर्य प्रदूषित करू नये.
- रमेश येवले, राजभवन अधिकारी