राज पांडे अपहरण आणि हत्याकांडाची चार्जशिट तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:11 AM2021-07-07T04:11:19+5:302021-07-07T04:11:19+5:30

नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज ऊर्फ मंगलू राजकुमार पांडे नामक १५ वर्षांच्या मुलाच्या अपहरण आणि हत्या ...

Raj Pandey prepares chargesheet of abduction and murder | राज पांडे अपहरण आणि हत्याकांडाची चार्जशिट तयार

राज पांडे अपहरण आणि हत्याकांडाची चार्जशिट तयार

Next

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज ऊर्फ मंगलू राजकुमार पांडे नामक १५ वर्षांच्या मुलाच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा एमआयडीसी पोलिसांनी अत्यंत जलदगतीने तपास करून दोषारोपत्र तयार केले आहे. बुधवारी हे दोषारोपत्र न्यायालयात सादर केले जाणार आहे. पोलीस उपायुक्त नुरूल हसन यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

१० जूनच्या सायंकाळी इंदिरानगरात राहणाऱ्या राज ऊर्फ मंगलूला क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने आरोपी सूरज रामभूज शाहू (वय २५) याने वंजारी कॉलेजकडे नेले आणि दगडाने ठेचून तसेच कटरने हाताच्या नस कापून राजची हत्या केली होती. आरोपी शाहू फॅब्रिकेटिंगची कामे करायचा. त्याच भागात राहणाऱ्या एका मुलीवर त्याचे एकतर्फी प्रेम होते. ते लक्षात आल्यानंतर राज पांडेच्या काकांनी आरोपी शाहूचा पाणउतारा केला होता. मुलीचे लग्नही लावून दिले होते. त्यानंतर काकाने आरोपीच्या नात्यातील महिलेवर अत्याचार केल्याचा समज झाल्याने आरोपी शाहू राजच्या काकांवर चिडून होता. त्यांच्यावर सूड उगविण्याची तो संधी शोधत होता. त्यासाठी त्याने राजचे अपहरण करून त्याची हत्या केली. तत्पूर्वी त्याने राजच्या कुटुंबीयांना फोन केला. राजचे सुखरूप पाहिजे असेल तर त्याच्या काकाचे शीर (मुंडके) कापून व्हॉट्सॲपवर फोटो पाठवा, अशी मागणी केली होती. १० जूनच्या मध्यरात्री आरोपीला पोलिसांनी बुटीबोरीजवळ पकडले आणि नंतर या थरारकांडाचा खुलासा झाला. या प्रकरणात जनभावना लक्षात घेता पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. दिलीप झळके, उपायुक्त नुरूल हसन यांनी ठाणेदार युवराज हांडे आणि द्वितीय निरीक्षक दिनेश लबडे यांना अत्यंत जलदगतीने तपास करण्याचे आदेश देऊन त्यासाठी मनुष्यबळही उपलब्ध करून दिले. त्यामुळे अवघ्या २५ दिवसात तपास पूर्ण करून चार्जशिट तयार करण्यात पोलिसांना यश मिळाले. बुधवारी ही चार्जशिट कोर्टात सादर केली जाणार आहे. पोलीस उपायुक्त नुरूल हसन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

---

फास्ट ट्रॅक, स्पेशल प्रॉसिक्युटरसाठी प्रयत्न

हा खटला फास्ट ट्रॅक (जलदगती) न्यायालयात चालवता यावा आणि त्यासाठी विशेष सरकारी वकील (स्पेशल प्रॉसिक्युटर) मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमतला सांगितले.

---

Web Title: Raj Pandey prepares chargesheet of abduction and murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.