राज ठाकरे यांची विश्वासार्हता कमी होतेय - रोहीत पवार यांची टीका
By कमलेश वानखेडे | Published: August 26, 2024 04:50 PM2024-08-26T16:50:50+5:302024-08-26T16:51:53+5:30
Nagpur : मतदारसंघातील महामार्गासाठी घेतली गडकरींची भेट
नागपूर : मनसेचे नेते राज ठाकरे हे कधी भाजप विरोधात तर कधी त्यांच्या बाजूने बोलतात. कधी शरद पवार यांच्या बाजूने तर कधी विरोधात बोलतात. त्यांची भूमिका नेहमी बदलत राहिली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे एकच आमदार आहे. एक नाशिकची महानगरपालिका होती. याशिवाय त्यांचे कोणीही निवडून आलेले नाही. यावरूनच दिसते की त्यांची विश्वासार्हता कुठेतरी कमी होत चालली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आ. रोहीत पवार यांनी केली.
आ. रोहीत पवार यांनी सोमवारी नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. मतदारसंघातील विकास कामांबाबत सविस्तर चर्चा केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, माझ्या मतदारसंघातून दोन नॅशनल हायवे जाणार आहेत. याबाबत चर्चा झाली. गडकरी नेहमी ते मदत करतात. विरोधीपक्षातील लोकांनाही ते मतद करतात. राज ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याबाबत विचारणा केली असता पवार म्हणाले, भाजप एखाद्या पक्षाचा वापर दुसऱ्या पक्षाची मते कमी किंवा विभागणी करण्यासाठी करत असतो. तुमचा तसा वापर होऊ नये. तुम्ही मराठी अस्मिता, संविधान आणि महाराष्ट्र धर्मावर विश्वास ठेवणारे नेते आहात. त्यामुळे भाजप तुमचा फक्त मत खाण्यासाठी वापर करून घेईल, ते फक्त होऊ देऊ, अशी विनंती त्यांनी केली.
संभाजीनगरच्या आंदोलनावरून ते म्हणाले, भाजप कशाचे आणि कुठे आंदोलन करते, हे पण त्यांना कळत नाही. वरुन आदेश आला की इथे नाचत बसायचे. राज्यात सामान्य कुटुंबातील महिला सुरक्षित नाही आणि हे काल्पनिक विषय काढून आंदोलन करत आहे. खा. कंगना रानावत यांच्या वक्तव्याच्या निषेध करीत त्यांच्यावर भाजपने कारवाई करावी, अशी मागणी आ. रोहीत पवार यांनी केली.