एका बंडखोर पर्वाचा युगांत; राजा ढाले यांना वाहिली शब्दसुमनांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:37 AM2019-07-17T11:37:21+5:302019-07-17T11:38:00+5:30

राजा ढाले या लढाऊ पँथरने अखेरचा श्वास घेतला आणि एका बंडखोर पर्वाचा अंत झाला. लोकमतशी बोलताना मान्यवरांनी दिलेल्या या शोकसंवेदना.

Raja Dhale; End of rebellion Era | एका बंडखोर पर्वाचा युगांत; राजा ढाले यांना वाहिली शब्दसुमनांजली

एका बंडखोर पर्वाचा युगांत; राजा ढाले यांना वाहिली शब्दसुमनांजली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजा ढाले म्हणजे मूर्तिमंत बंडखोरी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, न्यायाच्या प्रवाहातून तावून सुलाखून निघालेला तत्त्वज्ञ. १९७० च्या दशकात आधी साहित्यातून त्यांनी आपल्यातील बंडखोरीची पहिल्यांदा महाराष्ट्राला ओळख करून दिली. नंतर दलित पँथरसारखी संघटना स्थापन करून या बंडखोरीतला लढवय्येपणा दाखवून दिला. आंबेडकरोत्तर काळात बौद्ध समुदायावर होणाऱ्या अत्याचाराला खºया अर्थाने उत्तर देण्याचे काम या संघटनेने केले. तरुणांच्या मनात आंबेडकरी चळवळीची प्रचंड अस्मिता जागवून विरोधकांच्या मनात धडकी भरविण्यात दलित पँथरने अल्पावधीत यश मिळविले होते. म्हणूनच नामदेव ढसाळ यांच्यासह राजा ढाले हे नाव घराघरात पोहचले होते.  राजा ढाले या लढाऊ पँथरने अखेरचा श्वास घेतला आणि एका बंडखोर पर्वाचा अंत झाला. लोकमतशी बोलताना मान्यवरांनी दिलेल्या या शोकसंवेदना.

योगदान समाज कधीही विसरणार नाही
दलित पँन्थरचे संस्थापक राजा ढाले यांच्या निधनाच्या बातमीने मनाला अपार दु:ख झाले. त्यांच्यासोबत दलित चळवळीत काम करताना खूप काही शिकायला मिळाले. ७० च्या दशकात जन्मास आलेल्या दलित पँन्थरच्या चळवळीत त्यांनी स्व:ताला झोकून दिले होते. अनेक हालअपेष्टा उपासतापास व प्रसंगी तुरुंगवास भोगूनसुद्धा त्यांनी आपला तोल ढळू दिला नाही. मनात आणले असते तर आमदार, खासदार, मंत्रिपदही त्यांना भोगता आले असते पण सत्तेचा मोह त्यांनी केला नाही. निखळ आंबेडकरी विचारांची बलाढ्य लढाऊ संघटना उभी रहावी हे त्यांचे स्वप्न होते. राजा ढाले हे अत्यंत विद्वान व्यक्तिमत्त्वाचे धनी, गाढे व्यासंगी, आंबेडकरी चळवळीचे खºया अर्थाने भाष्यकार होते. त्यांचे योगदान समाज कधीही विसरणार नाही, त्यांच्या जाण्याने समाजाचे फार मोठे नुकसान झाले. ही पोकळी कधीही भरून निघणार नाही. मी त्यांना तमाम दलित पँन्थर्स कार्यकर्त्यांच्यावतीने दु:खद श्रद्धांजली वाहतो व विनम्र अभिवादन करतो.
- नितीन राऊत, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष

अभ्यासू, विद्वान, संघटक हरपला
राजा ढाले यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन संस्कृतीवर कायमची अमिट अशी छाप उमटवणाºया ढाले-ढसाळ युगाचा अंत झाला आहे. दलित पँथरच्या निर्मितीचे एक पायाभूत महत्त्वाचे शिल्पकार राहिलेले राजा ढाले यांच्यासारखा अभ्यासू, विद्वान, संघटक, दिशादर्शक आणि आंबेडकरी व बौद्ध दर्शन रुजवण्याची अखेरपर्यंत धडपड करणारा विचारवंत नेता आपण गमावून बसलो आहे. महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीच्यावतीने त्यांना विनम्र श्रद्धांजली.
- श्रीपाद भालचंद्र जोशी, महाराष्टÑ सांस्कृतिक आघाडी

नव्या मूल्यांची बीजपेरणी केली
राजा ढाले यांचे जीवनकार्य म्हणजे चेतनामयी आंदोलनाचे प्रेरक स्फुलिंग होय. राजाभाऊ यांनी आंबेडकरी वैचारिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात नव्या मूल्यांची बीजपेरणी केली आहे. साने गुरुजी यांच्या साप्ताहिकातील त्यांचा प्रसिद्ध झालेला ‘वेगळा स्वातंत्र्यदिन’ हा लेख मराठी विश्वाला कलाटणी देणारा ठरला. दलित पँथर चळवळ ते भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष हा त्यांचा प्रवास जसा वेधक आहे तसेच त्यांचे आंबेडकरी विश्वातील वैचारिक लेखन, समीक्षा, सांस्कृतिक कार्यही प्रेरक आहे. फुले-आंबेडकरी विचारधारा समृद्ध करीत त्यांनी पारंपरिक संशोधनाचा फोलपणा सिद्ध केला. समकालिन पिढीलाच नव्हे तर अनेक विचारवंतांना, लेखकांना, चित्रकार, संगीतकार, कवी घडविण्याचे काम त्यांनी केले. ते एक प्रेरणादायी मिथक झाले.
- ताराचंद्र खांडेकर, ज्येष्ठ विचारवंत

आंबेडकरी साहित्यात मोठे योगदान
राजा ढाले यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी मोठे योगदान दिले आहे. दलित पँथरच्या संस्थापकापैकी एक होते व या माध्यमातून अनेक कार्यकर्ते घडविले. त्यांनी काही वर्ष राजकीय क्षेत्रात काम केले पण तत्त्वाशी कधीही तोडजोड केली नाही. आंबेडकरी साहित्यात मोठे योगदान दिले व बाबासाहेबांचे विचार रुजविले. त्यांच्या निधनाने कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
- राजन वाघमारे, प्रवक्ता रिपाइं (ए)

बुद्ध विचार व समतेचे विचार पुढे नेले
राजा ढाले हे गंभीर व्यक्तिमत्त्व, क्रांतिकारी लेखक आणि अभ्यासपूर्ण विचार मांडणारे विचारवंत होते. त्यांच्याशी अनेकदा भेटी व्हायच्या. त्या भेटीत समाजासाठी तळमळ दिसायची. ते शांत मात्र त्यांचे नेतृत्व आक्रमक होते. आयुष्यभर सामाजिक परिवर्तनासाठी प्रयत्न केला. त्यांच्या विचारांमुळे अनेकांना स्फूर्ती व प्रेरणा मिळाली. बुद्ध विचार व समतेचे विचार पुढे नेण्यासाठी ते अग्रेसर राहिले. तरुणांना त्यांच्यासारख्या नेतृत्वाची खरी गरज आज जाणवते. त्यांना विनम्र श्रद्धांजली.

लढाऊ संघटना निर्माण केली
ज्या काळात आपल्या समाजातील तरुणांना राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात वाव नव्हता, राजकीयदृष्ट्या आपण वेगळे पडले होतो, खेड्यापाड्यात समाजावर अन्याय अत्याचाराची चढती कमान होती आणि मराठवाड्याच्या विभिषीकेने लोकांना निराश केले होते, त्या काळात तरुणांना एकत्र करून, त्यांची अस्मिता जागवून दलित पँथर नावाची बौद्ध युवकांची लढाऊ संघटना निर्माण करण्याच्या कामात राजा ढाले यांचा सिंहाचा वाटा आहे. त्या काळी पारंपरिक साहित्यिकांशीही त्यांनी दोन हात केले. ते नुसते लढाऊ संघटक नव्हते तर तत्त्वज्ञानी कवी आणि लेखक होते. पाली भाषेचे अभ्यासक व धम्मपदाचे अनुवादक होते. आंबेडकरी तत्त्वज्ञानाचा अभ्यासक, दलित पँथरचा प्रणेता व धम्मलिपीचा संपादक असलेल्या राजा ढाले यांच्या निर्वाणाने समाजाची फार मोठी हानी झाली आहे. त्यांच्या प्रेरणेने समाजाला तरुणाईचे सक्रिय नेतृत्व देण्याची प्रबळ इच्छा निर्माण व्हावी हीच या लढाऊ नेत्यास खरी श्रद्धांजली ठरेल.
- डॉ. भाऊ लोखंडे, ज्येष्ठ विचारवंत

 

Web Title: Raja Dhale; End of rebellion Era

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.