ग्राहक पंचायतीचे संस्थापक राजाभाऊ पोफळी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 08:55 PM2020-03-02T20:55:03+5:302020-03-02T21:15:16+5:30
आपल्या आक्रमक शैलीने ग्राहक चळवळीला ज्वर देणारे राजाभाऊ उपाख्य दत्तात्रय गोपाळराव पोफळी यांचे सोमवारी दुपारी पावणे चार वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षाचे होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आपल्या आक्रमक शैलीने ग्राहक चळवळीला ज्वर देणारे राजाभाऊ उपाख्य दत्तात्रय गोपाळराव पोफळी यांचे सोमवारी दुपारी पावणे चार वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षाचे होते. ग्राहकांच्या हिताचा विचार करता ‘प्रत्येक व्यापारी हा आधी ग्राहक असतो’ हे त्यांनी ठासून सांगितले आणि त्यांच्या याच धडपड्या स्वभावाने सरकारला ग्राहक संरक्षण कायदा पारित करवून घ्यावा लागला होता. ते खऱ्या अर्थाने ग्राहक चळवळीचा आणि ग्राहक पंचायतीचा मानबिंदू ठरले.
साधारणत: ४० दिवसाापूर्वीच राजाभाऊंनी वयाची ८३ वर्षे पूर्ण केली होती. वृद्धापकाळामुळे आता त्यांचे शरीर जर्जर झाले होते आणि आधाराविना चालणेही होत नव्हते. त्यामुळे, ते घरीच आपल्या खोलीत राहत आणि कोणी आले तर त्यांच्याशी हितगुजही करत असत. गेल्या दोन आठवड्यापासून त्यांची प्रकृती जरा जास्तच खालावली होती आणि त्यामुळे, त्यांनी इतरांशी भेटणे आणि बोलणेही बंद केले होते.
पत्रकारितेत असताना राजाभाऊंच्या चिकित्सक लेखणीचा परिणाम उत्तम होत असतानाच, भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांनी त्यांना कामगार आंदोलनात आणले आणि तेथूनच राजाभाऊंच्या डोक्यात ग्राहक हा विषय शिरला. तेव्हा दोन प्रकारच्या कामगार संघटना कार्यरत होत्या. राजाभाऊ जिथे होते, त्या संघटनेचा जोर वक्तृत्त्वावर आणि मुळ मुद्दयांना हात घालण्याचा होता. तर भाई बर्धन यांच्या कामगार संघटनेचा आक्रमकपणा हिंसक होता. मात्र, राजाभाऊंच्या नेतृत्वाचा लाभ लवकर होत असल्याचे बघून, भाई बर्धनही त्यांच्यावर मोहित झाले होते. त्यानंतर त्यांचा ओढा ग्राहक चळवळीकडे वळला. वस्तूंची खरेदी आणि विक्रीत यात प्रचंड तफावत दिसून येत होती. छापील किंमतीपेक्षा जादा किंमत घेऊन ग्राहकांना फसवले जायचे. शिवाय, वेगवेगळ्या करांची लूट केली जात होती. हा सर्व अभ्यास करताना ग्राहकांवर होणाºया अन्यायाविरूद्ध लढण्यासाठी १९७१-७२मध्ये नागपुरात उपभोक्ता मंच उभे राहिले. याच मंचाच्या माध्यमातून ‘उपभोक्ता समाचार’ या द्विसाप्ताहिक ाच्या माध्यमातून त्यांनी ग्राहकांचा आवाज बुलंद करण्यास प्रारंभ केला. प्रारंभिक अवस्थेत केवळ विदर्भासाठी काम करणाºया या संघटनेचे रूपांतरण १९७४ मध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतीत झाले.
ग्राहक पंचायतीचा मानबिंदू ठरलेले ‘राजाभाऊ पोफळी’
आपल्या लेखणीतून आणि कार्यातून त्यांनी ग्राहकांच्या हिताचा कायदाही पास करवून घेतला होता. त्यांचे कार्य केवळ चळवळीपुरताच केंद्रित नव्हते. तर त्यांनी श्रमिक पत्रकार चळवळ, ज्येष्ठ नागरिक मंडळ आणि वेगवेगळ्या क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. विशेष म्हणजे त्यांनी जोडाअक्षरे विरहित ‘खादाड पाहुणे’ हा बालकांसाठीचा कथासंग्रह लिहिला. मुलांना जोडाअक्षरे म्हणण्यास येणारा त्रास त्यांना माहित होता. शिवाय, ‘छडी लागे छम छम’ हा बालकथासंग्रहही मुलांसाठी सादर केला. त्यांचे कामगार चळवळीवरील ‘आपण आणि आपली संघटना’, ‘वेतन लढा’ आणि ‘उद्योगात कामगारांचा सहभाग’ तर ग्राहक चळवळीवरील ‘शासन व ग्राहक कल्याण’, ‘ग्राहक विचार’, ‘ग्राहक कार्यकर्ता : रिती नीती’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आकाशवाणीवरूनही त्यांच्या ‘कामगार कथा’ प्रसारित झाल्या आहेत. ते अनेक पुरस्कारांनी सन्मानितही झाले आहेत.
व्यक्त केली होती वेदना!
: वयाची ८३ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने त्यांच्याशी बोलण्याचा योग आला तेव्हा त्यांनी ग्राहक चळवळीच्या सद्यस्थितीबाबत खंत व्यक्त केली होती. कुठल्याही आंदोलाची दखल घेतली गेली, त्याला राजकीय पाठबळ मिळाले, शासकीय आधार मिळाला की नंतर त्याची वाताहत होते, ती वाहावत जाते. नेमकी तीच स्थिती सध्याच्या ग्राहक चळवळीची असल्याची वेदना राजाभाऊ पोफळी यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली होती.
राजाभाऊ पोफळींनी समाजाला दिशा दिली : गडकरी
ग्राहक पंचायतच्या कार्याचा देशभर विस्तार करण्यात ‘अखिल भारतीय ग्राहक पंचायत’चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ पोफळी यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या निधनाने ग्राहक चळवळीची मोठी हानी झाली आहे. पत्रकार म्हणून देखील राजाभाऊ पोफळी यांनी आपल्या लेखनीतून समाजाला नेहमीच दिशा देण्याचे काम केले. त्यांना माझी विनम्र श्रद्धांजली.
-नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री
फार मोठी हानी : देवेंद्र फडणवीस
प्रारंभी पत्रकारिता आणि नंतरच्या काळात अ.भा. ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून देशव्यापी काम करणारे राजाभाऊ पोफळी यांच्या निधनाने या दोन्ही क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. ग्राहक चळवळीला देशव्यापी करण्यात त्यांनी मोठा हातभार लावला होता, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
प्रारंभीच्या काळात त्यांनी अनेक पत्रकारांना घडविण्याचे काम केले. विशेषत: ग्रामीण भागातून चांगले लिहिणारे निवडून त्यांना मोठी संधी देण्याचे काम त्यांनी केले. अनेक पत्रकार घडविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. एक संयमी पण, संघर्षी असे हे व्यक्तिमत्त्व होते. पत्रकारितेतून निवृत्तीनंतर त्यांनी ग्राहक चळवळीच्या क्षेत्रात स्वत:ला झोकून दिले. देशभर प्रवास करून त्यांनी त्याही क्षेत्रात मोठे काम केले. साधेपणा, सदाचार, दृढनिश्चयी हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनोखेपण होते. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना मिळो, अशी प्रार्थना करतो.