१.१५ कोटींच्या लूट प्रकरणाचे ‘राजस्थान कनेक्शन’, कर्मचारीदेखील निघाला आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 11:35 AM2023-08-04T11:35:46+5:302023-08-04T11:37:47+5:30

आतापर्यंत तीन अटकेत, पुण्यातून पकडलेल्या आरोपींचे डेस्टिनेशन होते जयपूर : पोलिसांकडून रोख रकमेचा शोध सुरू

'Rajasthan connection' of 1.15 crore loot case in Nagpur; The employee also turned out to be an accused | १.१५ कोटींच्या लूट प्रकरणाचे ‘राजस्थान कनेक्शन’, कर्मचारीदेखील निघाला आरोपी

१.१५ कोटींच्या लूट प्रकरणाचे ‘राजस्थान कनेक्शन’, कर्मचारीदेखील निघाला आरोपी

googlenewsNext

नागपूर : इतवारीतून १.१५ कोटींच्या लूट प्रकरणात नागपूर पोलिसांना आणखी एक यश मिळाले आहे. पुण्यातील दोन आरोपींना अटक झाल्यानंतर आता या कटात सहभागी असलेल्या स्थानिक ‘टीपर’लादेखील ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीतून आणखी तीन ते चार आरोपींची नावे समोर आली असून, हे सर्व जण राजस्थानमधीलच असल्याची बाबदेखील स्पष्ट झाली आहे. या प्रकरणात आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध राज्यांमध्ये पोलिस पथक रवाना झाले आहेत.

मंगळवारी रात्री इतवारीतील अरविंद अर्बन सहकारी बँकेजवळ हा गुन्हा घडला होता. इतवारीतील व्यापारी बिरमभाई पटेल यांच्याकडे काम करणारा प्रदीप सारस्वत व त्याचा सहकारी प्रल्हाद स्वामी १.१५ लाखांची रोकड भुतडा चेंबरच्या लॉकरमध्ये रक्कम जमा करण्यासाठी निघाले होते. त्यावेळी २२ ते २४ वयोगटातील दोन तरुण दुचाकीसमोर आले. त्यांनी गाडी थांबविली व त्यानंतर त्यांनी दोघांनाही मारहाण केली. माऊझरचा दाखवत त्यांनी पैसे व दुचाकी घेऊन पळ काढला.

सीसीटीव्ही फुटेज व इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या आधारे दोन आरोपी नागपुरातून विमानाने पुण्याला गेल्याचे पोलिसांना कळाले. त्यानंतर पुणे पोलिसांच्या मदतीने त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीतून पटेल यांच्याकडे काम करणाऱ्या आरोपींच्या स्थानिक सहकाऱ्याचे नाव समोर आले. त्यानेच या प्रकाराची टीप दिली होती. पोलिसांना त्याला नागपुरातून अटक केली. या प्रकरणात आणखी तीन ते चार आरोपी असून, ते लुटीनंतर लगेच वेगवेगळ्या राज्यांच्या दिशेने रवाना झाले. त्यांच्याकडेच रोख रक्कम असून, ती त्यांनी वाटून घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यांचा शोध घेण्यात येत असून, इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या आधारे मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांना पकडण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

सहा तासांत आरोपी अटकेत

लुटीची घटना पावणेनऊच्या सुमारास झाली व त्यानंतर दोन आरोपी विमानाने रात्री उशिरा पुण्याला पोहोचले. त्यांना अवघ्या सहा तासांच्या कालावधीत पोलिसांनी ताब्यात घेतले. नागपूर पोलिसांच्या माहितीवरून पुणे पोलिसांनी मध्यरात्रीनंतर तीन वाजताच्या सुमारास त्यांना अटक केली. हे दोन्ही आरोपी पुण्यावरून जयपूरला जाणार होते. तसे तिकीटदेखील त्यांनी काढले होते. पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी ते थेट जयपूरला न जाता पुण्याला पोहोचले.

रोख रकमेबाबतदेखील तपास 

दरम्यान, पटेल यांच्या कार्यालयातून १.१५ कोटींची रोकड बाहेर निघाली होती. ही रक्कम हवाल्याची होती की आणखी कुठल्या माध्यमातून इतकी रोख आली होती याचादेखील पोलिसांकडून तपास करण्यात येणार आहे.

याअगोदरदेखील लूट-दरोड्यात सहभाग

पोलिसांनी अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे उघड केलेली नाहीत. मात्र, हे तीनही आरोपी व ज्यांचा शोध घेण्यात येत आहेत, ते सर्व राजस्थानमधील एकाच जिल्ह्यातील आहेत. यातील काही सदस्य हे सराईत गुन्हेगार असून, याअगोदरदेखील त्यांचा लूट-दरोड्यामध्ये सहभाग राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: 'Rajasthan connection' of 1.15 crore loot case in Nagpur; The employee also turned out to be an accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.