राजस्थानच्या 'फलोदी'मुळे सट्टा बाजारात उलटफेर; त्यात पाच राज्यांच्या एक्झिट पोलची भर
By नरेश डोंगरे | Updated: November 30, 2023 22:41 IST2023-11-30T22:40:17+5:302023-11-30T22:41:13+5:30
क्रिकेटमध्ये गुंतलेल्या सट्टा बाजाराची राजकीय रिंगणातही उडी

राजस्थानच्या 'फलोदी'मुळे सट्टा बाजारात उलटफेर; त्यात पाच राज्यांच्या एक्झिट पोलची भर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आतापर्यंत क्रिकेटमध्ये गुंतलेल्या सट्टा बाजाराने आज राजकीय रिंगणातही उडी घेतली आहे. एकीकडे पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांचा निकाल कसा असेल, त्यासंबंधाने विविध वाहिन्यांवर एक्झिट पोल जाहीर झाले असतानाच 'फलोदी'नेही गेम उघड करताच सट्टा बाजार कमालीचा गरम झाला आहे.
महाराष्ट्रात 'भेंडवळ' सुपरिचित आहे. वर्षानुवर्षांपासून ज्याप्रमाणे भेंडवळ मांडली जाते आणि पीकपाण्याचे भाकित केले जाते त्याचसारखे राजस्थानमधील फलोदित राजकारण आणि निवडणुकांचा सट्टा खुलतो. देशभरातील सटोडे फलोदीच्या भाकितांवर डोळे बंद करून विश्वास करतात आणि सट्टा लावतात.
विशेष म्हणजे आतापर्यंत सट्टाबाजार आधी विश्वचषक आणि टी-२०त गुंतला होता. मात्र, आज एक्झिट पोल आणि फलोदीने आकडे जाहीर करताच सट्टा बाजारानेही आपली दुकानदारी सुरू केली आहे.
एकीकडे एक्झिट पोलमधून राजस्थानमध्ये भाजपला ११५ ते ११७, तर काँग्रेसला ६८ ते ७० सिट दाखविल्या आहेत. दुसरीकडे हेच आकडे अधोरेखित करून फलोदीने पाच राज्यांत फक्त आणि फक्त राजस्थानमध्येच बीजेपी फेवर ४५-५५चा रेट देऊन देऊन बीजेपीची क्लियरकट घरवापसी सांगितली आहे. सायंकाळी हा रेट येताच सट्टाबाजार खुलला अन् लगवाडी खयवाडीही सुरू झाली.
बाकी राज्याचे सेशन रेट
विविध वृत्त वाहिन्यांवर आलेल्या पाच राज्यातील पक्षीय बलाबलांचा अंदाज लक्षात घेत सट्टा बाजाराने आपले गणित पुढे केले आहे. त्यानुसार, रात्री ८ वाजेपर्यंत सट्टा बाजाराने केवळ संभाव्य सिटांचा 'खावो या लगाओ' (खयवाडी किंवा लगवाडी)चे सेशन रेट दिले आहेत. त्यानुसार, छत्तीसगड काँग्रेस ५१ - ५३ आणि भाजप ३७-३९, मध्य प्रदेश काँग्रेस ११७-११९ आणि भाजप १०८-१११, तेलंगणा काँग्रेस ६२-६४ असे सेशन रेट दिले आहे.
मिझोरमकडे दुर्लक्ष
सट्टा बाजाराने मिझोरमच्या निवडणुकांकडे दुर्लक्ष केले कीकाय अशी शंका निर्माण झाली आहे. मिझोरममध्ये काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही प्रमुख राजकीय पक्ष कमकुवत असल्याचे सटोड्यांचे मत आहे. त्यामुळे लगवाडी करणाऱ्यांची संख्याही किरकोळ असल्याचे बोलले जाते.