राजा ढाले यांना आंबेडकरी गौरव पुरस्कार
By admin | Published: July 26, 2016 02:39 AM2016-07-26T02:39:06+5:302016-07-26T02:39:06+5:30
ज्येष्ठ पत्रकार, लेखक, कवी, मूर्तिकार, गीतकार आणि समता सैनिक दल व आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकते ...
युगकवी केतन पिंपळापुरे स्मृती प्रतिष्ठान : भदंत सुरेई ससाई यांच्या हस्ते रविवारी पुरस्कार वितरण
नागपूर : ज्येष्ठ पत्रकार, लेखक, कवी, मूर्तिकार, गीतकार आणि समता सैनिक दल व आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकते दिवंगत मार्शल केतन पिंपळापुरे यांच्या प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ समता सैनिक दल व समता संगर प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि युगकवी केतन पिंपळापुरे स्मृती प्रतिष्ठानातर्फे ‘युगकवी केतन पिंपळापुरे आंबेडकरी प्रतिभा गौरव पुरस्कारा’ची घोषणा करण्यात आली आहे. आंबेडकरी विचारवंत, तत्त्वचिंतक नेते व बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक राजा ढाले यांना यावर्षीचा पहिलाच पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
दी पीपल एराचे कार्यकारी संपादक सुदामदादा सोनुले, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय निमंत्रक अशोक बोंदाडे आणि राष्ट्रीय सहसंघटक सुनील सारीपुत्त यांनी सोमवारी सीताबर्डी येथील समता सैनिक दलाच्या केंद्रीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली. स्मृतिशेष केतन पिंपळापुरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ३१ जुलै रोजी दुपारी २ वाजता डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृह काँग्रेसनगर येथे पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते हा पुरस्कार राजा ढाले यांना प्रदान केला जाईल. समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक अॅड. विमलसूर्य चिमणकर अध्यक्षस्थानी राहतील. प्राचार्य सिद्धार्थ मेश्राम, डॉ. दीपक ठमके, केतकी केतन पिंपळापुरे प्रामुख्याने उपस्थित राहतील. पत्रकार परिषदेला अनिल कांबळे, रितेश गायमुखे, सुधीर मेश्राम, अश्विन टेंभुर्णे प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)