तलवारीची मुठही तुटलेली, साधी स्वच्छताही केली नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 10:30 AM2023-07-31T10:30:15+5:302023-07-31T10:31:34+5:30
जयंतीदिनीही उपेक्षाच : नागपूर नगरीचे संस्थापक राजे बख्त बुलंद शाह मनपाकडून दुर्लक्षित
नागपूर :नागपूर नगरीचे संस्थापक गोंड राजे बख्त बुलंद शाह यांची रविवारी जयंती होती. यानिमित्त विधान भवन चौकातील त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने आदिवासी समाजासह विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे नेते कार्यकर्ते अभिवादनासाठी एकत्र आले होते; परंतु जयंतीदिनी पुतळा परिसरातील अस्वच्छता संतापजनक होती. इतकेच नव्हे तर राजेंच्या हातातील तलवारीची मूठही तुटलेली होती. एकूणच या सर्व प्रकारामुळे येथे आलेल्या आदिवासी समाजबांधवांसह नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
राजे बख्त बुलंद शाह यांच्या जयंतीनिमित्त विधान भवन परिसरातील त्यांच्या पुतळा परिसराची स्वच्छता करावी, याबाबतचे एक निवेदन आदिवासी विकास परिषदेच्या वतीने मनपाला आधीच देण्यात आले होते. मात्र, मनपाने याकडे दुर्लक्ष केले.
रविवारी जयंतीदिनी पुतळ्याजवळ सकाळपासूनच लाेकांचे येणे सुरू झाले. तेव्हा परिसरातील अस्वच्छतेमुळे लाेकांमध्ये प्रचंड संताप पसरला. त्यानंतर पुतळ्याच्या हातातील तलवारीची मूठ गायब असल्याचे पाहून नागरिकांचा पारा अधिकच भडकला. काही वेळानंतर मनपाच्या अग्निशमन दलाची एक गाडी परिसर स्वच्छ करण्यासाठी आली. मात्र, तोवर बराच उशीर झाला होता. एक कर्मचारी छोटासा हार घेऊन अभिवादनासाठी येत होता. मात्र, संतापलेल्या आदिवासी बांधवांनी मनपाचा निषेध करीत त्यांना पुतळ्याला हार घालू दिला नाही.
संतप्त आदिवासी समाजाबांधव आज मनपा आयुक्तांना भेटणार
या प्रकारामुळे आदिवासी समाजबांधवांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे दिनेश शेराम यांनी सांगितले की, हा महापुरुषांचा अपमान आहे. कुठल्याही महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी असेल तर त्या-त्या महापुरुषांच्या पुतळा परिसराची स्वच्छता करणे ही मनपाची जबाबदारी आहे. तसेच मनपाचा एक जबाबदार अधिकारी जाऊन पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणे आवश्यक असते. मात्र, या गोष्टीकडे मनपाने दुर्लक्ष केले. त्यामुळे आम्ही सोमवारी मनपा आयुक्तांची भेट घेऊन याबद्दल आपली नाराजी व्यक्त करीत एक निवेदन सादर करणार आहोत. यात भविष्यात अशा चुका होणार नाहीत याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात यावी, तसेच दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली जाईल.