राजेंद्र गवई यांची काँग्रेसवर नाराजी : आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 07:35 PM2019-08-24T19:35:07+5:302019-08-24T19:38:29+5:30
काँग्रेससोबत असलेले रिपाइंचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी काँग्रेस निवडून न येणाऱ्या जागाही मित्र पक्षासाठी सोडण्यास तयार नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर व अचलपूर या दोन जागा रिपाइंसाठी न सोडल्यास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत राहील की नाही, याबाबत काँग्रेस अजूनही अंतिम निर्णय घेऊ शकलेली नाही. दुसरीकडे काँग्रेससोबत असलेले रिपाइंचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी काँग्रेस निवडून न येणाऱ्या जागाही मित्र पक्षासाठी सोडण्यास तयार नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर व अचलपूर या दोन जागा रिपाइंसाठी न सोडल्यास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.
शनिवारी रविभवन येथे पत्रपरिषद घेऊन त्यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. डॉ. राजेद्र गवई यांनी सांगितले की, गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही भाजप-शिवसेना युतीला हरवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली. अमरावती येथून आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांना निवडून आणले. तेव्हा आम्ही लोकसभेची एकही जागा मागितली नव्हती. परंतु विधानसभेसाठी आम्हाला जास्त जागा सोडाव्या लागतील, असे तेव्हा आम्ही त्यांना सांगितले होते. आता विधानसभेसाठी आम्ही काँग्रेसकडे १० जागांची मागणी केली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर व अचलपूर या दोन मतदार संघाचाही समावेश आहे. या दोन्ही मतदार संघातून काँग्रेस गेल्या अनेक वर्षात निवडून आलेली नाही. येथे रिपाइं स्वतंत्र लढल्यास दुसऱ्या क्रमांकावर राहते. तेव्हा या दोन्ही जागा रिपाइंसाठी सोडाव्यात, अशी मागणी आम्ही केली आहे. परंतु काँग्रेस यावर काहीही बोलण्यास तयार नाही. आ. विरेंद्र जगताप यांच्या दबावामुळे काँग्रेस अचलपूरची जागा रिपाइंला सोडत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दर्यापूर व अचलपूर या दोन जागा रिपाइंला न सोडल्यास काँग्रेसला मोठे नुकसान होईल. आघाडीतून बाहेर पडून वंचित बहुजन आघाडीसोबत जाण्याचाही आपला विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. या दोन जागा सोडत असतील तरच काँग्रेससोबत आघाडीबाबत चर्चा होईल, अन्यथा आम्ही आघाडीतून बाहेर पडू आणि अमरावती जिल्ह्यातील ८ मतदारसंघासह महाराष्ट्रातील ५० जागा लढवू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
बच्चू कडू यांच्याविरुद्ध लढण्यास तयार
डॉ. राजेंद्र गवई यांनी सांगितले की, अचलपूर या विधानसभा मतदारसंघातून आ. बच्चू कडू हे सातत्याने निवडून येतात. कॉंग्रेस ही जागा सातत्याने हरत आहे. आ. कडू यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराविरुद्ध मी स्वत: लढण्याचे आव्हान स्वीकारले आहे. परंतु काँग्रेस मला हे आव्हान स्वीकारू देण्यासही तयार नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.