राजगृह व्हावे सत्तेचे केंद्र :आनंदराज आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 12:25 AM2019-02-09T00:25:46+5:302019-02-09T00:28:32+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले मुंबईतील राजगृह हे सत्तेचे केंद्र व्हावे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कामाला लागा, असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी रमाई महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले मुंबईतील राजगृह हे सत्तेचे केंद्र व्हावे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कामाला लागा, असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी रमाई महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने भगवाननगर मैदानावर रमाई भीमराव आंबेडकर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर समाजकल्याण विभागाचे उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, रमेश जाधव, रिपब्लिकन मुव्हमेंटचे नरेश वाहणे उपस्थित होते.
आनंदराज आंबेडकर पुढे म्हणाले, आंबेडकरी जनतेने सत्ता संपादन करायला हवी. यासाठी सर्व आंबेडकरी विचारवंत, साहित्यक, लोकांनी एका ठिकाणी आले पाहिजे. आपण विखुरले असल्याने आपली ताकद दिसत नाही. सध्याची स्थिती पाहता सर्वांना एकसंघ होण्याची गरज आहे. आरएसएस, भाजपची सत्ता घालविण्याचे आवाहनही त्यांनी केले. इंदू मिलची जागाही सरकार देण्याच्या तयारीत नव्हते. जनता आंदोलन करणार असल्याने सरकारने सुरक्षा भिंत मोठी केली होती. मात्र त्यानंतरही जनतेने आंदोलन केल्यानेच जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी रमाई यांच्या त्यागाच्या घटनांना उजाळा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात माता रमाईचे मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले. यावेळी ‘शिवाजी अंडग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' या महानाट्याचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनात शीतल गडलिंग, शिरीष फुलझेले, अनिकेत कुत्तरमारे, सिद्धार्थ बनसोड, शुभम दामले, साकेत भगत, शुभम गडलिंग, सिद्धांत पाटील आदींचा सहभाग होता.