राजकुमार बडोले पुन्हा अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:47 AM2017-09-21T01:47:44+5:302017-09-21T01:47:59+5:30
गेल्या काही महिन्यांपासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे टीकेचे धनी ठरत असलेले सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे टीकेचे धनी ठरत असलेले सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी ते शासकीय जमिनीवरील अतिक्रमणामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांनी राजकीय वजनाचा दुरुपयोग करून सडक अर्जुनी येथील शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. या आरोपाची सत्यता तपासून त्यात तथ्य आढळून आल्यास कायद्यानुसार पुढील कारवाई करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. परिणामी बडोले यांना धक्का बसला आहे.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते तेजराम मुनेश्वर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील सर्वे क्र. १८२ ही झुडपी जंगलाची जमीन आहे. या जमिनीला लागून बडोले यांचा भूखंड आहे. बडोले यांनी या भूखंडावर घर बांधण्यासाठी झुडपी जंगलाच्या ०.०५ एचआर जमिनीवर अतिक्रमण केले. यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. पण राजकीय वजनामुळे बडोले यांच्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. प्रकरणावर बुधवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने सर्व पक्षांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर येत्या चार आठवड्यांमध्ये जमिनीची संयुक्त मोजणी करण्याचा व अतिक्रमण आढळून आल्यास पुढील तीन महिन्यांत कायद्यानुसार कारवाई करण्याचा आदेश दिला. संयुक्त मोजणी करणाºयांमध्ये जिल्हाधिकारी, सडक अर्जुनी नगर पंचायतचे मुख्याधिकारी, याचिकाकर्ता व बडोले यांचा समावेश राहणार आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. सचिन सांबरे तर, नगर पंचायततर्फे अॅड. महेश धात्रक यांनी बाजू मांडली.